नवी दिल्ली – हिंडेनबर्ग रिसर्चने प्रख्यात भारतीय उद्योजक गौतम अदानी यांच्यावर कॉर्पोरेट जगतातील महाफसवणुकीचा आरोप केला असून आपल्या आरोपांवर आम्ही ठाम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आम्ही अदानी यांना 88 प्रश्न विचारले आहेत. त्यातील एकाही प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिले नसल्याकडेही हिंडेनबर्गने लक्ष वेधले आहे.
आमचा अहवाल जारी होऊन 36 तास झाले आहेत. मात्र त्यात उपस्थित केलेल्या एकाही गंभीर मुद्द्यावर अदानी यांनी उत्तर दिलेले नाही. आम्ही जे प्रश्न विचारले आहेत ते अगदी थेट स्वरूपाचे आहेत. त्यामुळे अदानी यांच्या कंपनीला जर स्वत:ला निर्दोष सिध्द करायचे असेल तर त्या प्रश्नांची उत्तरे देऊन ते तसे करू शकतात. खरेतर त्यांच्यासाठी ही एक संधी होती. मात्र त्यांनी एकाही प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही असे हिंडेनबर्ग रिसर्चने म्हटले आहे.
धमकी दिल्याचा आरोप
आम्हाला जसे अपेक्षित होते त्यानुसार अदानी समुहाने आम्हाला धमकावण्याचा मार्ग पत्करला आहे. आमच्या अहवालात कोणताही रिसर्च नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र आम्हाला हा अहवाल करण्यासाठी दोन वर्षे लागली आहेत. 106 पानांचे आमचा अहवाल आहे व त्यात 32 हजार शब्द आहेत याकडे िंहंडेनबर्गने लक्ष वेधले आहे. आम्ही आमच्या अहवालावर ठाम आहोत व कायदेशीर कारवाई करण्याच्या धमकीचे आम्ही स्वागत करतो.
आमच्या विरोधात केली जाणारी कोणतीही कायदेशीर कारवाई आधारहीन असेल कारण आम्ही अमेरिकेतून काम पाहतो. जर अदानी याबाबत गंभीर असतील तर त्यांनी अमेरिकेत आमच्या विरोधात कारवाई करावी. आमच्याकडे कागदपत्रांची एक मोठी यादी असून कायदेशीर प्रक्रियेच्या वेळी आम्ही अदानी यांच्याकडून त्याची मागणी करू असे हिंडेनबर्गने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
अगोदर रूग्णवाहिका चालवायचे
हिंडेनबर्ग रिसर्चची स्थापना 2017 मध्ये करण्यात आली. नॅथन अँडरसन हे संस्थापक आहेत. 1937 च्या हिंडेनबर्ग विमान दुर्घटनेवरून त्यांनी कंपनीचे हे नाव ठेवले आहे. त्या जर्मन विमानाला लागलेल्या आगीत 35 जणांचा मृत्यू झाला होता. फॅक्टसेट रिसर्च या कंपनीतून अँडरसन यांनी आपल्या करिअरची सुरूवात केली. सुरूवातीच्या दिवसांत आपण इस्त्रायलमध्ये ऍम्बुलन्स अर्थात रूग्णवाहिका चालवण्याचे काम करायचो असे त्यांनी स्वत:च एका मुलाखतीत पूर्वी सांगितले होते.