सुवासिनींना प्रतीक्षा गौराईच्या आगमनाची

सातारा – गौराईला दागिन्यांनी सजवण्यापासून ते वेगवेगळ्या फराळांच्या जिन्नस खरेदीसाठी बाजारपेठेत महिलांची गर्दी झाली आहे. भाद्रपद शुद्ध सप्तमीच्या मुहूर्तावर ज्येष्ठा गौरीचे आवाहन व आगमन होत आहे. गौरीला विविध प्रकारच्या दागिन्यांनी सजविता यावे, गणरायाबरोबरच गौरही सजून जावी यासाठी सोने-चांदीच्या दागिन्यांसह स्वस्तातील तरीही आकर्षक अशा बेन्टेक्‍स दागिन्यांची बाजारपेठेत रेलचेल झाली आहे. गौरीसाठी मंगळसूत्र, लक्ष्मीहार, बाजूबंद, कंबरपट्टा, नथ तसेच गणेशासाठी मुकुटापासून दुर्वांपर्यंत चांदीचे दागिने सराफ पेढ्यांवर विक्रीसाठी आहेत. गौरीचे मुखवटे व गौराईंसाठीचे विविध प्रकारचे हार, लोखंडी स्टॅन्ड, कापडी व पीओपीचे तयार हातही उपलब्ध झाले आहेत.

विविध दागिन्यांसह गौरींच्या आकर्षक मुखवट्यांनी बाजारपेठ सजली आहे. सामान्यांना परवडतील अशा किंमतीचे बेन्टेक्‍समध्ये मोहनमाळ, बांगड्या, नथ, तोडे, मुकुट, बाजूबंद, गळ्यातला हार, कंबरपट्टेही उपलब्ध आहेत. गौरीची संपूर्ण मूर्तीही अनेक विक्रेत्यांनी आणली आहे. मुखवट्यांची जोडी 400 रुपयांच्या पुढे आहे. सराफ कट्ट्यांवर चांदीची फुले, दुर्वा आणि अगदी मुकुटासह विविध प्रकारचे दागिने उपलब्ध झाले आहेत. तुऱ्याचे, खडे जडविलेले धातूचे मुकुटही नागरिक आता आवर्जून घेतात.

सामान्य नागरिक सोन्याची हौस चांदीवर भागवितात. बहुतेकांचा कल चांदीच्या दागिन्यांकडेच असतो. सराफ कट्ट्यावर असे अनेक दागिने विक्रीस आहेत. त्यामध्ये दुर्वा, मनगटी, चांदीचा मोदक, चांदीचा छोटासा उंदीर, जास्वंदीसारखे त्रिशूळ, केवड्याचे पान, पान-सुपारी, नारळ, हार, जानवे अशा विविध चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. काही सराफांकडे एक ग्रॅममध्येही दागिने उपलब्ध आहेत दिवाळीत येणाऱ्या फराळांनी सुध्दा बाजारपेठ सजली आहे. बेसनलाडू, चकली करंजी अनारसे शंकरपाळी इतर फराळाचे पदार्थ नव्वद ते एकशे वीस रुपये पावशेर या किमतीत उपलब्ध आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.