अंबरनाथ : सोशल मीडियाने आजपर्यंत अनेकांना रातोरात स्टारडम मिळवून दिले आहे. तर कोणाचे आयुष्य उद्धवस्त झाले आहे. असेच काही एका तरूणाच्या बाबतीत घडले असून त्याच्या एका फोटोने त्याला प्रसिद्धी मिळवून दिली आहे. एवढेच नाही तर त्याचे कौतूक अनेक मोठ्या व्यक्तींनी केले आहे.
अंबरनाथ मधील सागर जाधव गॅस वितरण करत असल्याने त्याची गॅसवाला अशी ओळख होती. सागरची शरीर यष्टी पिळदार व भारदस्त हे त्याचे आकर्षण होते. दोन दिवसापूर्वी सागर सिलेंडरच्या टेम्पोला टेकून उभा असताना त्यांच्या नकळत एक तरुणाने त्याचा फोटो क्लिक केला. हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यामुळे आज सागरची ओळख बदलली आहे. गॅसवालाचा तो ‘सिलेंडर मॅन’ झाला असून त्याच्या फोटोला मिळालेल्या लाईक्स कमेंट पाहता तो सध्या एक सेलिब्रिटी झाला आहे.
सागर हा आंबरनाथ येथील लक्ष्मी नगर परिसरात आपल्या काका, काकू, भाऊ आणि पत्नीसह राहतो. लक्ष्मीनगर परिसरातच असलेल्या भारत गॅसचं गोडाऊन आहे. या ठिकाणी गेल्या 12 वर्षांपासून सागर नोकरी करत आहे. आधी सडपातळ असलेल्या सागरने मागील पाच वर्षांपासूनच जिममध्ये जाऊन भारदस्त पिळदार शरीरयष्टी कमवली आहे.
दोन दिवसांपूर्वी अशाच प्रकारे नेहमीप्रमाणे गॅस वितरण करणारा सागर दोन दिवसापूर्वी गॅसच्या टेम्पोजवळ उभा असताना एका नेटीझनने त्याच्या पिळदार कसलेल्या शरीर यष्टीला त्याच्याही नकळत आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपले आणि त्याचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला.
अगदी काही तासात या फोटोवर लाखो कमेंटचा पाऊस पडला असून प्रत्येकजण त्याच्या पिळदार शरीरयष्टीची मनापासून स्तुती करत आहे. आय ए एस अधिकारी तुकाराम मुंढे पासून ते प्रसिद्ध अभिनेता कुशल बद्रिके ने देखील त्याला कौतुकाची थाप दिली आहे. इतकेच नव्हे तर त्याचे सिलेंडर मॅन अस नामकरण देखील झाले आहे .
काल पर्यंत गॅसवाला म्हणून त्या परिसरात ओळखल्या जाणाऱ्या सागरला आज अनेकजण सिलेंडरमॅन म्हणून ओळखू लागले आहे. त्याचा अप्रतिम फोटो पहिल्याचा फोन खणखणू लागताच त्यालाही नवल वाटले. मात्र काल पासून तो अचानक सेलिब्रेटी बनला असून त्याला वेब सिरीज मध्ये किंवा सिरीयल मध्ये काम द्या यासारख्या कमेंट्स येत असल्याने त्याची लोकप्रियता कमालीची वाढली आहे.