सूरत – गुजरातमधील सूरतमध्ये गुरुवारी एक मोठी दुर्घटना घडली समोर आली आहे. येथील एका प्रिंटिंग मिलमध्ये पहाटे गॅसची गळती झाली असूनयामध्ये सहा कर्मचाऱ्यांना गुदमरून जीव गमवावा लागला आहे. यासह 20 हून अधिक जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विश्व प्रेम डाईंग अँड प्रिंटिंग मिलजवळ टँकरमधून गॅस गळती झाल्याने हा अपघात झाला.
मिलजवळ एक नाला असल्याचे सांगण्यात येत आहे. पहाटेच्या सुमारास अज्ञात टँकरचालक त्या नाल्यात विषारी रसायन टाकत होता. त्याचवेळी विषारी वायू गळू लागला. यावेळी मिल कामगारही त्याच्या कचाट्यात आले आणि त्यांना गुदमरायला सुरुवात झाली. ही माहिती लोकांपर्यंत पोहोचताच घबराट पसरली. याबाबत पोलिसांना माहिती दिली गेली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले व तपास सुरू केला.
गंभीर अवस्थेत असलेल्या लोकांना तातडीने रुग्णालयात नेण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. पुढिल तपास पोलिस करत आहेत.