अंबरनाथ – अंबरनाथमधील आनंदनगर एमआयडीसीत गॅसगळती गळती झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आर. के. केमिकल्स या कंपनीत घडली असून यामध्ये 18 ते 20 कामगारांची प्रकृती खालावली आहे. या कामगारांना उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहे.
आर. के. केमिकल्स या कंपनीमध्ये सल्फ्युरिक ॲसिडवर डिस्टिलेशनची प्रक्रिया केली जाते. कंपनीत आज सकाळी नेहमीप्रमाणे डिस्टिलेशनची प्रक्रिया सुरू असताना १० वाजताच्या सुमारास अचानक प्लँटमधला एक पाईप निसटला आणि त्यातून हवेत गॅस पसरला.
हा गॅस थेट बाजूलाच असलेल्या प्रेस फिट नावाच्या कंपनीत घुसला. त्यामुळे तिथे काम करत असलेल्या १८ ते २० कामगारांना उलट्या, मळमळ, गुदमरणे असा त्रास सुरू झाला.या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी अग्निशमन दल, शिवाजीनगर पोलीस आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.