पुणे – मार्चअखेरीस अंदाजपत्रकातील निधी संपविण्याचा घाट महापालिकेत सध्या सुरू असून त्याचाच आणखी एक प्रकार समोर आला आहे. उद्यान विभागाकडून एकाच उद्यानाच्या विकासकामांसाठी दोन स्वतंत्र निविदा काढण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे दोन्ही कामांसाठीच रक्कम तसेच कामेही एकाच प्रकारची आहेत. त्यामुळे, एकाच कामासाठी दोन स्वतंत्र निविदा कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महापालिकेच्या उद्यान विभागाकडून प्रभाग क्रमांक 27 “अ’मधील युनिटी पार्क या उद्यनाता विकासकामे प्रस्तावित करण्यात आली आहे. या कामांसाठी महापालिकेच्या वित्तिय समितीने मान्यता दिल्यानंतर महापालिकेने या कामांच्या निविदा जाहीर केल्या आहेत.
मात्र, हे काम करण्यासाठी दोन निविदा काढण्यात आल्या आहेत. या दोन्ही निविदा उद्यानात विविध विकासकामे करणे या नावाने असून दोन्ही कामांसाठी 8 लाख 92 हजार 850 रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामुळे एकाच उद्यानात एकाच प्रकारच्या कामासाठी एकाच रकमेच्या दोन निविदा कशा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
प्रकरणाची चौकशी करणार…
उद्यान विभागाकडून या निविदांची माहिती मागविण्यात येणार असल्याचे अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांनी स्पष्ट केले. एकाच स्वरुपाचे आणि एकाच ठिकाणी काम असल्यास एकच निविदा काढणे अपेक्षीत आहे. मात्र, बजेट हेड स्वतंत्र असल्यास वेगळ्या निविदा काढाव्या लागतात. मात्र, त्यानंतरही कामाचे स्वरुप आणि रक्कम एकच असल्याचे दिसत असल्याने या प्रकरणाची माहिती घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल.