अशी घ्या बागेची काळजी!

झाडांसह बागेची निगा राखणे सर्वात महत्त्वाचे

आपल्या घराजवळ बाग किंवा बगीचा असावा, असे सर्वाना वाटते. मात्र शहरांमध्ये जागेअभावी बगीचा शक्य नसतो. बाग शक्य असते. गच्चीवर किंवा खिडकीमध्ये झाडे लावून बाग बनवता येते. मात्र झाडे लावली की संपले, असे नाही. झाडांसह बागेची निगा राखणे सर्वात महत्त्वाचे असते.

झाडांची निगा राखण्याचे अनेक प्रकार आहेत. त्यात महत्त्वाचे म्हणजे रोज न चुकता पाणी घालणे. तसेच आठवडय़ातून एकदा झाडांची साफसफाई करून त्यांना कुठल्या किडय़ांचा किंवा रोगाचा प्रादूर्भाव झाला नाही ना, हे पाहणे. गुलाब, टोमॅटो, मिरची, सिमला मिरची, चिनी गुलाब, रातराणी, भेंडी, वांगी या फळे आणि फुलांची रोपे सर्वात लवकर कीटकांना बळी पडतात. या झाडांच्या तुलनेत मोगरा, इंडियन रबर, फर्न्‍स, पाम, शेवंती, झेंडू, जाई, जुई, काकडी, भोपळा, तोंडली, दोडकी, कारली, पालक, मेथी, कोथिंबीर, कडुलिंब, मनी प्लांट, ओवा, गवती चहा या रोपांना कीड तसेच रोगांचा कमी त्रास होतो. त्यामुळे रोपे आणि झाडांची नीट निगा राखली नाही तर कोणतेही रोप रोगाला बळी पडू शकते.

झाडांना वाढीसाठी पाणी आवश्यक आहे. मात्र अति पाणीही त्यांच्यासाठी मारक ठरू शकते. कुंडीमधून पाण्याचा निचरा न होणे. बाग किंवा कुंडय़ा ठेवलेली जागा ओलसर राहणे. कुंडीखालील भांडय़ाची अस्वच्छता या गोष्टी किडय़ांच्या प्रादूर्भावाला कारणीभूत ठरतात. वेळेवर काळजी घेतली आणि साधे-सोपे उपाय केले तर कुठल्याही कीटकनाशकाचा वापर न करता बागेचे व्यवस्थित रक्षण करता येते. या कीटकांचे निरीक्षण करण्यासाठी घरात एक चांगले बहिर्वक्र भिंग ठेवा. त्यामुळे अतिसूक्ष्म किडय़ांचा शोध घेता येईल. शिवाय त्याचा वेगळा उपयोगही आहे. लहान मुलांना भिंगाद्वारे आपण शास्त्रीय माहिती देऊ शकतो.

टोमॅटो, गुलाब, मिरची, सिमला मिरची आणि वांगी यावर अगदी नेहमी आढळणारा उपद्रवी कीटक म्हणजे मावा. पेरू किंवा पेअर या फळांच्या आकाराचे हे कीटक म्हणजे हालचाल करणारा प्राणी असे समीकरण आपल्या डोक्यात बसलेले असते. लोकरीसारखी किंवा कापसासारखी, पण पावडरी वाढ पुंजक्यांच्या स्वरूपात रोपांच्या पानावर दिसली, तर मावा असण्याची दाट शक्यता असते. त्यांच्यामुळे पाने विद्रुप दिसू लागतात. या माव्यांच्या उत्सर्जनात मधासारखा पदार्थ असतो. त्याला चिकटपणा असतो. त्यामुळे ते पानांवर चिकटून राहते. त्यावर कवके वाढू लागतात आणि रोप अधिकच रोगट होऊन पाने गळू लागतात. रोपांची वाढ खुंटते आणि कळ्या अकाली गळून पडतात. अशी रोपे किंवा चांगली वाढलेली झुडपे पाहता पाहता कोमेजून जातात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.