नगर : कचर्‍याच्या वजनवाढीचा नगरसेवकाकडून पर्दाफाश

ठेकेदाराच्या कर्मचार्‍यांनी वाहनात भरल्या दगड झालेल्या सिमेंटच्या गोण्या

नगर : नगरमधील कचरा उचलण्यासाठी 2 वर्षांपासून स्वयंभू संस्थेला महापालिकेच्या वतीने ठेका देण्यात आलेला आहे. कचरा संकलन करणार्‍या वाहनातील कचर्‍याच्या वजनावर बिले आकारणी होते. त्यामुळे वाहनांत दगड-गोटे भरुन वजन वाढविले जात असल्याचे आरोप होते. या कथित आरोपांचा आज पुराव्यानिशी शिवसेना नगरसेवक सचिन शिंदे यांनी पर्दाफाश केला.

ठेकेदाराचे कर्मचारी शहरातील कचरा उचलण्याऐवजी बांधकाम साहित्य त्यामध्ये भरतात, अशी ओरड होती. बांधकामावरील दगड झालेल्या सिमेंटच्या गोण्या, वीटा त्यात भरुन वजन वाढविण्याचे उद्योग सुरु होते. कचर्‍यापेक्षा बांधकाम साहित्याचे वजन जास्त असते. त्या माध्यमातून कचरा गाडीचे वजन जास्त भरल्याने ठेकेदारामार्फत जास्त बिलाची आकारणी करून महापालिकेची लूट केली जात असल्याचा आरोप नगरसेवक सचिन शिंदे यांनी केला आहे. आता यासंदर्भात पुराव्यासह रितसर तक्रार करुन अशा प्रकारांना पाठिशी घालणार्‍यांवरच कारवाईची मागणी करणार असल्याची माहिती नगरसेवक सचिन शिंदे यांनी दिली.

कल्याणरोडवरील उड्डाणपूल येथे ठेकेदारांची कचरा उचलणारी गाडी सिमेंटच्या गोण्या भरीत असतानाच नगरसेवक सचिन शिंदे यांनी महापालिकेच्या अधिकार्‍यांना घटनास्थळी बोलावून हा प्रकार उघडकीस आणला. यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, अशी तंबीही त्यांनी ठेकेदाराचे कर्मचारी व महापालिकेच्या अधिकार्‍यांना दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.