पूर्व हवेलीतील अनेक गावांत कचराभूमी

सोरतापवाडी – हवेली तालुक्‍यातील मांजरी, शेवाळेवाडी, कदमवाकवस्ती, लोणीकाळभोर, थेऊर, कुंजीरवाडी, नायगाव, उरूळी काचंन, आळंदी म्हातोबाची ग्रामपंचायत हद्दीत कचऱ्याची प्रचंड समस्या जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. कचरा वेळोवेळी उचलला जात नसल्याने दुर्गंधी, घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पूर्व हवेलीत हजारो एकर गायरान जमीन आहे. त्यात एक मोठा कचरा प्रकल्प होऊ शकतो. मात्र, राजकीय नेते आणि प्रशाकीय अधिकाऱ्यांची मानसिकता प्रबळ असण्याची गरज आहे.

मांजरी हद्दीत महामार्गावर मांजरी उपबाजाराच्या अलीकडे कचरा उचलला गेला नाही. त्यामुळे महामार्गावर सर्वत्र कचराच दिसतो. राजश्री शाहू महाराज बॅंकेसमोर व मांजरी येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राजवळील ओढ्याजवळ कचरा साठलेला आहे. द्राक्ष बागेजवळ कचरा टाकला जात आहे. हा महामार्ग की कचरा मार्ग हेच कळत नाही. कदमवाकवस्तील पालखी तळाच्या दोन्हीही रस्त्यावर व पालखी तळात कचरा टाकला जात आहे. लोणी स्टेशन परिसरात तशीच परिस्थिती आहे.

लोणी व कदमवाकस्तीतील ओढ्याशेजारी नागरिक रस्त्यावर बिनधास्त कचरा टाकत आहेत. लोणी येथील कचरा उचलून तो नदीच्या शेजारी असलेल्या ग्रामपंचायतीच्या जागेत टाकला जात आहे. कुंजीरवाडीत कचरा आळंदी रस्त्याकडेला शाळेच्या भिंतीच्या कडेला टाकला जात आहे. नायगाव येथील कचरा गायरानात टाकत आहेत. सोरतापवाडी याला अपवाद आहे. ऊरूळी कांचन येथील कचरा गोळीबार मैदानात टाकला जात आहे.

मोठ्या कचरा प्रकल्पाची गरज : नागरिकांची मागणी

कचरा प्रकल्पासाठी शासनाकडे जागा मागितली होती. स्थानिक कंपन्याशी चर्चा करून त्यांच्या एसआर फंडातून प्रकल्प करून देण्यासाठी कंपन्या तयार आहेत. परंतु जागेअभावी प्रकल्प रखडला आहे. जागेची मागणी पीएमआरडीकडे केली आहे. त्यासाठी पीएमआरडीचा डेव्हलपमेंट प्लॅन तयार होत आहे. लवकरच ग्रामपंचायतीला जागा मिळणार आहे.
– गौरी गायकवाड, सरपंच, कदमवाकवस्ती.

Leave A Reply

Your email address will not be published.