बारामती : करोना विषाणूजन्य आजाराचे रुग्ण शहरी बरोबरच ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. यावर्षातील संकष्टी चतुर्थीला अनेक भाविक अष्टविनायक तीर्थक्षेत्री ‘श्रीं’च्या दर्शनाला येतात. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून या दिवशी अष्टविनायक मंदिर बंद ठेवण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या अधिपत्याखालील अष्टविनायक प्रथम तीर्थक्षेत्र मयुरेश्वर मंदिर, थेऊर येथील चिंतामणी मंदिर, चिंचवडचे मोरया गोसावी समाधी स्थळ बंद ठेवले जाणार आहे. याबाबतची माहिती चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त विनोद पवार यांनी दिली.
संकष्टी चतुर्थीनिमित्त उद्या मंदिर परिसरात गर्दी करु नये. प्रशासन व चिंचवड देवस्थान ट्रस्टला सहकार्य करावे, असे आवाहन ट्रस्टने केले आहे. भाविकांसाठी मंदिर बंद असले तरी श्रींच्या परंपरेने चालत आलेल्या पूजा-अर्चा, नैवद्य व इतर धार्मिक विधी हे संपन्न होणार आहे.
दरम्यान, गुरुवार दिनांक 1 एप्रिल रोजी सर्व भाविकांना पहाटे साडेपाच वाजल्यापासून नेहमीप्रमाणे मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे.