पुणे – आपल्या देशातील प्रत्येक सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो आणि जेव्हा गणेश चतुर्थीनिमित्त गणरायाचे आगमन होते, तेव्हा तर सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते. यंदाचा गणेश चतुर्थीचा सण 10 सप्टेंबर म्हणजेच आज पासून सुरु होत आहे. त्यामुळे सर्वत्र उत्सवाची तुफान तयारी सुरू आहे.
10 दिवस चालणाऱ्या या उत्सवात गणपती बाप्पाला विविध प्रकारचे नैवेद्य अर्पण केले जातात. या दिवशी गणपती बाप्पाची विशेष पूजा आणि आराधना केली जाते. तर जाणून घेऊयात आज गणेश चतुर्थीच्या दिवशी स्थापनेचा शुभ मुहूर्त काय आणि कुठल्या मंत्रांचा जप केल्याने बाप्पा प्रसन्न होतील…..
गणपतीची पूजा आणि स्थापनेची शुभ वेळ –
10 सप्टेंबर 2021 रोजी, शुक्रवारी गणरायाची प्राणप्रतिष्ठा सूर्यो दयापासून ते मध्यान्ह काळ संपेपर्यंत म्हणजेच अंदाजे दुपारी 1:30 पर्यंत प्राणप्रतिष्ठा करता येणार आहे. तर यावर्षी अन्नत चतुर्दशी 19 सप्टेंबर 2021 रोजी साजरी केली जाईल. या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातो.
गणरायाची पूजा करताना “ओम गं गणपतये नम:” या मंत्राचा जप करत गणेशाला पाणी, फुले, अक्षदा, चंदन आणि धूप-दीप तसेच फळ नैवेद्य अर्पण करा. गणेशाला त्यांचे सर्वात प्रिय मोदक प्रसाद म्हणून अर्पण करा आणि यंदा गणेश उत्सवाचा आनंदाने लाभ घ्या.