Pune Ganesh Visarjan 2024 | पुण्याची वैभवशाली परंपरा असणाऱ्या गणेशोत्सवाची आज गणपती विसर्जनाने सांगता होणार आहे. त्यासाठी पुणेकरांनी जोरदार तयारी केली आहे. आज सकाळी गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.
गुलालांची उधळण आणि फुलांच्या पायघड्या घालून गणपती बाप्पांचे चौकाचौकात स्वागत केले जात आहे. ढोले-ताशावर तरुणाईने ठेका धरला आहे. तसेच पारंपारिक खेळ देखील पाहायला मिळत आहे. यावेळी भाविकांची अलोट गर्दी जमली आहे. पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपतीचे विसर्जन सायंकाळी 4 वाजून 34 मिनिटांना झाले. गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या.. अशा घोषणांनी बाप्पाला निरोप देण्यात आला.
पहिला मानाचा गणपती कसबा गणपतीची मिरवणूक 10:30 वाजता सुरु झाली. त्या पाठोपाठ तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम आणि तुळशीबाग तासाभराच्या फरकाने दोनशे मीटरवर असणाऱ्या बेलबाग चौकात पोहचले. तर पाचवा मानाचा गणपती केसरीवाडा 3:30 वाजता बेलबाग चौकात पोहचला आहे. मिरवणूक सुरू झाल्यापासून पाच तास उलटून गेल्यावर पहिला मानाचा कसबा गणपती अलका चौकात पोहचला नव्हता. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे विसर्जन मिरवणुका उशिरापर्यंत सुरू राहणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
तर दुसरीकडे, दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला देखील सुरूवात झाली आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती सहा बैलजोड्या आणि आकर्षक रथासह बेलबाग चौकात दाखल झाला आहे. नुकतेच पोलिसांच्या हस्ते आरती संपन्न झाली असून मिरवणूक लक्ष्मी रस्त्याने मार्गस्थ झाली आहे.