Ganpati Festival 2024 – आपल्या देशातील प्रत्येक सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो आणि जेव्हा गणेश चतुर्थीनिमित्त गणरायाचे आगमन होते, तेव्हा तर सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते. यंदाचा गणेश चतुर्थीचा सण आज (शनिवार ७ सप्टेंबर) पासून सुरु होत आहे. त्यामुळे सर्वत्र उत्सवाची तुफान तयारी सुरू आहे.
१० दिवस चालणाऱ्या या उत्सवात गणपती बाप्पाला विविध प्रकारचे नैवेद्य अर्पण केले जातात. या दिवशी गणपती बाप्पाची विशेष पूजा आणि आराधना केली जाते. तर जाणून घेऊयात गणेश चतुर्थीच्या दिवशी स्थापनेचा शुभ मुहूर्त काय आणि कुठल्या मंत्रांचा जप केल्याने बाप्पा प्रसन्न होतील…..
गणपतीची पूजा आणि स्थापनेची शुभ वेळ –
शनिवार ७ सप्टेंबर रोजी, गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. त्यासाठी सकाळी ८ ते ९.३०, दुपारी ११.२० ते १. ४०, संध्याकाळी २ ते ५.३० अशी स्थापनेची शुभ वेळ असणार आहे. तर यावर्षी अनंत चतुर्दशी १७ सप्टेंबर २०२४ रोजी साजरी केली जाईल. या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातो.
गणरायाची पूजा करताना “ओम गं गणपतये नम:” या मंत्राचा जप करत गणेशाला पाणी, फुले, अक्षदा, चंदन आणि धूप-दीप तसेच फळ नैवेद्य अर्पण करा. गणेशाला त्यांचे सर्वात प्रिय मोदक प्रसाद म्हणून अर्पण करा आणि यंदा गणेश उत्सवाचा आनंदाने लाभ घ्या.
प्रतिष्ठापना पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची यादी
१. गणपती बाप्पाला विराजमान केल्यावर चौरंगावर किंवा पाटावर ठेवण्यासाठी वस्त्र, तर दाराबाहेर काढण्यासाठी रांगोळी.
२. पूजेसाठी लागणारे महत्त्वाचे साहित्य म्हणजे निरांजन, उदबत्ती, समई, धूप, कापूर, वाती, आरतीचे ताट.
३. पाच फळे, सुपारी, नारळ, विड्याची पाने, सुक्या खोबऱ्याची वाटी व त्यात ठेवायला गूळ, सुट्टे पैसे.
४. पूजेच्या ठिकाणी ठेवण्यासाठी कलश, पाणी व आंब्याची पाने.
५. निवडलेल्या दुर्वांची २१-२१ ची जुडी.
६. गणपतीची मूर्ती सजवण्यासाठी व बाप्पाला आवडतात म्हणून लाल जास्वंदाची फुले, सुगंधित फुले, दुर्वा.
७. पूजेदरम्यान श्लोक म्हणण्यासाठी अथर्वशीर्ष, गणपती स्तोत्र, आरतीचे पुस्तक.
८. मूर्तीला अर्पण करण्यासाठी जानवे, कार्पासवस्त्र (कापसाचे व्रस्त्र) आणि पूजेसाठी दोन ताम्हण, तीन पोफळे.
९. अभिषेक करण्यासाठी पंचामृत, सुगंधित जल, शुद्ध पाणी, अष्टगंध, हळद, कुंकू आणि अक्षता.
१०. गणेशाला अभिषेक करण्यासाठी दूध, दही, तूप, मध आणि साखरेपासून बनवलेले पंचामृत.