लंडन – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली याच्याकडे जागतिक क्रिकेटला नवी उभारी देण्याची क्षमता आहे. त्यामुळे भविष्यात तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचाही (आयसीसी) अध्यक्ष व्हावा, अशी अपेक्षा इंग्लंडचे माजी कसोटी क्रिकेटपटू डेव्हिड गावर यांनी व्यक्त केली आहे.
करोनाचा धोका जगभर पसरल्याने सध्या जागतिक क्रिकेट ठप्प आहे. आता हा धोका कधी संपुष्टात येणार व क्रिकेटला पुन्हा कधी गती मिळणार हे सध्यातरी कोणीही सांगू शकत नाही. मात्र, करोनानंतरचे क्रिकेट निश्चितच बदलणार आहे. त्याचे व्यवस्थापन करणे सर्व देशांच्या क्रिकेट मंडळांनाच नव्हे तर आयसीसीलाही कठीण जाणार आहे. सध्या आयसीसीचे नेतृत्व आणि व्यवस्थापन ज्यांच्याकडे आहे त्यांच्यापेक्षा जास्त क्षमता गांगुलीकडे आहे. तो ज्या पद्धतीने बंगाल क्रिकेट संघटनेत तसेच आता बीसीसीआयमध्ये काम करत आहे ते पाहता आयसीसीचे सक्षम नेतृत्व तोच करू शकतो, असे मतही गावर यांनी व्यक्त केले.
आज अनेक देशांमध्ये लॉकडाऊन आहे. त्यामुळे खेळाडूंना आपापल्या घरातच राहावे लागत आहे. अशा परिस्थितीत त्यांना मानसिक स्तरावर उभारी देण्याची आवश्यकता आहे. करोनाचा धोका संपुष्टात आल्यावर जेव्हा पुन्हा एकदा जागतिक क्रिकेट सुरू होईल त्यावेळी खेळाडूंना आरोग्यपूर्ण व ताजेतवाने वाटेल असे वातावरण गरजेचे आहे. तसेच त्यांच्या अडचणी आणि विविध देशांच्या क्रिकेट मंडळांना झालेले नुकसान यातून बाहेर काढण्याची क्षमता केवळ गांगुलीकडेच दिसते. तोच एकमेक पर्याय आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी आहे, असा विश्वासही गावर यांनी व्यक्त केले.
बीसीसीआय अध्यक्ष म्हणृन गांगुली सर्वोत्तम काम करत आहे. तसेच करोनाबाधितांसाठीही त्याने सामाजिक भानही दाखवले. यातूनच एक माजी क्रिकेटपटू म्हणून नव्हे तर एक व्यक्ती म्हणूनही तो चांगला आहे. खेळाची, खेळाडूंच्या अडचणींची तसेच जागतिक क्रिकेटची त्याला चांगली जाण आहे.
करोनानंतरच्या क्रिकेटला नवी उभारी देण्याचे तसेच नवी दिशा देण्याचे काम तो निश्चितच करू शकतो. प्रशासकीय कामकाजातदेखील तो तज्ज्ञ आहे. प्रशासनावरही त्याची चांगलीच पकड आहे. अशाच व्यक्तीने केवळ एका देशाच्या क्रिकेट मंडळात राहू नये तर त्याच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट व्यवस्थापनाचेही नेतृत्व असावे असे वाटते, असेही गावर म्हणाले.