दुबई – भारतीय संघाचे माजी कर्णधार अनिल कुंबळे यांच्या जागी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांची आयसीसीच्या क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी दिली.
कुंबळे हे 2012 सालापासून या पदावर कार्यरत होते. जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू तसेच एक प्रशासकीय जबाबदारी स्वीकारणारी व्यक्ती म्हणून गांगुली यांचा अनुभव आयसीसीला पुढे जाण्यासाठी आणि क्रिकेट संदर्भातील निर्णयांना योग्य दिशा देण्यासाठी महत्त्वाचा ठरेल.
कुंबळे यांच्या कार्यकाळात डीआरएस अधिक नियमिपणे वापरण्यापासून त्यात वेळोवेळी सुधारणा करत गेल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटमध्ये सुधारणा झाली असून गोलंदाजीच्या शैलीसंदर्भातही या काळात निर्णय घेण्यात आले. आता त्यापुढेही गांगुली यांचा अनुभव महत्त्वाचा ठरणार आहे.
अफगाणिस्तानमध्ये सत्तांतर झाल्यानंतर तेथील क्रिकेटच्या परिस्थितीचा समिक्षा करण्यासाठी एका कार्यकालीन समितीची स्थापना करण्यात आली असून पुढील निर्णय या समितीच्या अहवालानंतरच घेण्यात येणार आहे.