मुंबई – आलिया भटचा लीड रोल असलेल्या “गंगूबाई काठियावाडी’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. त्यामुळे या सिनेमाबद्दलच्या प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. निर्बंधांमुळे हा सिनेमा
थिएटरऐवजी थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवरच रिलीज होणार अशी चर्चा काही दिवसांपूवी सुरू होती. मात्र “गंगूबाई…’चे डायरेक्टर संजय लिला भन्साळीने हा सिनेमा कोणत्याही परिस्थितीत ओटीटीवर रिलीज केला जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
हा सिनेमा मोठ्या पडद्यावर रिलीज करण्यासाठीच तयार केला गेला आहे. त्यामुळे निर्मात्यांना आणखीन कितीही काळ वाट बघायला लागली तरीही हा सिनेमा थिएटरमध्येच रिलीज केला जाईल, असे भन्साळींनी म्हटले आहे. हा सिनेमा ज्या कलात्मकतेने बनवण्यात आला आहे, ते पाहता संजय लिला भन्साळी स्वतःवरच जाम खूष आहे.
व्हिज्युअल्स आणि इमोशन्सच्या दृष्टीने विचार केला तर हा आपला आतापर्यंतचा सर्वोत्तम सिनेमा ठरू शकतो, असा भन्साळींना विश्वास वाटतो आहे. ही कलाकृती ओटीटीवर प्रदर्शित झाली तर
त्याला योग्य न्याय मिळू शकणार नाही, असे वाटल्यानेच “गंगूबाई…’ थिएटरवर रिलीज केला जाण्याबाबत भन्साळी ठाम आहे. 30 जुलैला सिनेमा रिलीज करण्याचे नियोजन पूर्वी केले गेले होते.