कानपूर – उत्तर प्रदेशातील कुख्यात गॅंगस्टर विकास दुबे याच्या मालकीच्या 67 कोटी रुपयांच्या सुमारे डझनभर मालमत्ता आज जप्त करण्यात आल्या. जुलै 2020 मध्ये पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत दुबे मारला गेला होता. कानपूरजवळच्या बिकरू गावात दुबे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी पोलीस उपाधिक्षक आणि अन्य सात पोलीस कर्मचाऱ्यांची गोळ्या घालून हत्या केली होती.
त्यानंतर काही दिवसांनी दुबेला उज्जैन येथील मंदिराजवळून अटक करण्यात आली होती. कानपूरला आणले जात असताना दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला हाता. त्यावेळी झालेल्या चकमकीदरम्यान तो मारला गेला होता.
कानपूर परिमंडळ पोलीस अधिक्षकांनी दिलेल्या अहवालानंतर लगेचच जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी गॅंगस्टर कायद्यांतर्गत दुबेची सर्व मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. ही मालमत्ता अवैध उद्योगातून कमावलेली आहे. ताब्यात घेतलेली मालमत्ता विकास दुबे, त्याची पत्नी रिचा दुबे, कुटुंबातील अन्य सदस्य आणि जवळच्या नातेवाईकांच्या नावावर आहे, असे जिल्हा दंडाधिकारी नेहा शर्मा यांनी सांगितले.
कानपूर, कानपूर देहाट आणि लखनौ येथील 13 स्थावर मालमत्तांचे मूल्यांकन सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या मदतीने करण्यात आले, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.