मुंबई – गॅंगस्टर रवी पुजारीसाठी काम करणाऱ्या सुरेश पुजारीला अटक करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पोलिस सुरेश पुजारीच्या मागावर होते. तो बऱ्याच काळापासून देशाबाहेर पसार झाला होता. तेव्हापासून त्याला अटक करण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न केले जात होते.
अखेर, पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले असून सुरेश पुजारीला फिलिपिन्समधून अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुरेश पुजारीला ऑक्टोबरला अटक करण्यात आली असल्याची माहिती एका माध्यमाच्या संकेतस्थळावर सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आली आहे. त्याला भारतात आणण्याचे प्रयत्न आता सुरू करण्यात आले आहेत.
एफबीआय आणि सीबीआय देखिल सुरेश पुजारीच्या मागावर होते. एफबीआयनेच त्याला संयुक्त कारवाईमध्ये अटक केल्याची माहिती मिळत आहे. गेल्या महिन्यात सुरेश पुजारी फिलिपिन्समध्ये असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती.
केंद्रीय तपास यंत्रणांनी याची माहिती इंटरपोलला दिल्यानंतर त्याच्या अटकेसाठी पावले उचलण्यात आली. अखेर त्याला फिलिपिन्सच्या परांकी शहरातून एका इमारतीच्या बाहेर तो उभा असताना अटक करण्यात आली आहे.