मुंबई – ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या “स्कूप’ वेब सीरीज विरोधात गॅंगस्टर छोटा राजन याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. या वेब सीरीजमध्ये इतर सर्वांची नावे बदलण्यात आली आहेत. मात्र, केवळ माझेंच खरे नाव का कायम ठेवण्यात आले आहे?, असा सवाल याचिकेतून करण्यात आला आहे. या वेब सीरीजमुळे आपली प्रतिमा मलिन होत असल्याचा दावाही त्याने केला आहे.
हंसल मेहता यांची स्कूप ही वेब सीरिज 2 जून रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली. ही वेब सीरीज अंडरवर्ल्ड, दहशतवाद, गुन्हेगारी या सर्व विषयांवर आधारित आहे. स्वत: बाजू मांडण्यासाठी लढणाऱ्या काही पत्रकारांवर ही सीरिज आधारित आहे.
जिग्ना व्होरा यांनी लिहिलेल्या Behind Bars in Byculla: My Days in Prison या पुस्तकावर आधारित असून अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा एक फोन आल्यानंतर पत्रकार असलेल्या जागृती पाठकचे आयुष्य कसे बदलते हे यात दाखवण्यात आले आहे.
दरम्यान वेब सीरिज रिलीज करण्याआधी माझी पूर्व सहमती न घेता माझी प्रतिमा मलीन केली गेली आहे, असे म्हणत हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी 27 जूनपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.