माजगाव येथे आमदार थोपटे यांचे प्रतिपादन; कॉंग्रस-राष्ट्रवादीचे मोठे योगदान
भोर – भोर तालुक्यातील भुतुंडे खोऱ्यातील विकासकामात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन महाआघाडीचे कॉंग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांनी केले.
भुतुंडे येथे सरसेनापती यसाजी कंक यांच्या प्रतिमेचे पूजन करुन आमदार संग्राम थोपटे यांनी मळे, कुरुंजी, काबंरे, करंदी, वाढाणे, तळे म्हसवली, गोरड म्हसवली, आस्कवडी, जोगवडी, माजगांव, लव्हेरी, ब्राह्मणघर आदी गांवात गांवभेट प्रचार दौरा करुन मतदारांशी संपर्क साधला, त्यावेळी माजगाव झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, मदन खुटवड, संतोष सोंडकर, शिवाजी कंक, राजेश काळे, प्रा. सुरेश तांगडे, काळूराम मळेकर, विठ्ठल वरखडे, अनिल डोंबे, सदाशिव धुमाळ, किसन बोडके, श्रीरंग मोरे, देसाई आदिंसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने या प्रचार दौऱ्यात सहभागी झाले होते.
संग्राम थोपटे म्हणाले की, भाटघर धरण परिसरातील 41 गावांत रस्ते, वीज, नळपाणीपुरवठा, शैक्षणिक सुविधा, आरोग्य सेवा, आणि भाटघर धरण प्रकल्पातील 41 गांवांना नागरी सुविधा मिळाव्यात यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करुन 18 कोटींचा निधी मिळवून दिला आहे, तर 41 गावांतील 6 हजार प्रकल्पग्रस्तांचे वारसांना प्रकल्पग्रस्त असल्याचे दाखले 101 वर्षांनंतर देण्यासाठी केलेले प्रयत्न विसरता येणार नाहीत. माळवाडी ते मळे-भुतुंडे या रस्त्याच्या कामासाठी 6 कोटी रुपये खर्चाचा निधी मंजूर असून हे काम निविदा रस्त्यावर आहे. तर लव्हेरी येथील आरोग्य केंद्रासाठी 1 कोटी 71 लाखांचा निधी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिला आहे. या इमारतीचे काम पूर्ण झाले असून याचा लाभ या भागातील नागरिकांना होणार आहे. तसेच विकासकामांसाठी 65 कोटींचा सुधारीत आराखडा नुकताच सादर केला असल्याचे त्यांनी नमूद केले.
नाव न घेता विरोधकांना काढला चिमटा
राज्यात आम्ही सत्तेत नसतानाही मतदारसंघात कोट्यवधीची विकासकामे केली आहेत. मात्र, ज्यांची राज्यात सत्ता आहे ते म्हणतात “प्रतिनिधी बदला परिस्थिती बदलेल’ अशा लोकांनी हे सांगावे की त्यांची सत्ता असताना मतदारसंघात किती निधी आणला? असा प्रश्न उपस्थित करुन आमदार थोपटे यांनी विरोधकांना नाव न घेता चिमटा काढला.
सुळेंच्या भोरमध्ये उद्या तीन सभा
भोर विधानसभा मतदारसंघात शुक्रवारी (दि. 11) बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे महाआघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी भोरला येणार आहेत. यावेळी त्यांच्या भोरमध्ये तीन जाहीर सभा होणार आहे. भोर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी प्रचारात सहभागी होतील असा विश्वास आहे. भोर-वेल्हे-मुळशी तालुक्यात महाआघाडीला चांगला प्रतीसाद मिळत असल्याने कॉंग्रेसच्या विजयासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन आमदार संग्राम थोपटे यांनी केले.