“बेटी बचाओ – नारी शक्ती’ संकल्पनेवर मर्दानी खेळांची प्रात्याक्षिके
पिंपरी – विश्व श्रीराम सेनेच्या वतीने मोशी येथील इंद्रायणी नदी घाटावर छटपूजेनिमित्त शनिवारी सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी गंगा आरतीचे आयोजन केले होते. हजारो भाविक त्यासाठी उपस्थित होते. कोल्हापूर येथील सर्वोदय या संस्थेच्या मुलींनी “बेटी बचाओ – नारी शक्ती’ या संकल्पनेवर आधारित चित्तथरारक मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली. तसेच, विविध धार्मिक, सामाजिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आले.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, महापौर राहुल जाधव, विश्व श्रीराम सेनेचे अध्यक्ष लालबाबू गुप्ता, सिने कलाकार ज्यूनियर गोविंदा, उद्योजक कार्तिक लांडगे, दिनेश यादव, धनंजय आल्हाट, पांडुरंग साने, सुभाष माछरे, मंगेश हिंगणे, योगेश बोराटे, चेतन बोराटे, बबन हिंगणे, नितिन गायकवाड़, आबा घारे, उमेश सिंह, छठ पूजा समिती सदस्य श्यामबाबू गुप्ता, विनोद प्रसाद, मुन्ना सिंह, उमेश सिंह, किरण गायकवाड़, पृथ्वी प्रसाद, ब्रिजेश प्रजापती, रोहित प्रसाद, विकास गुप्ता, राष्ट्रीय संपर्क प्रमुख प्रमोद गुप्ता, अक्रम शेख़, राहुल गुप्ता, प्रकाश कांबळे, विवेक भुजबळ, पप्पू गुप्ता, डॉ. पंकज गुप्ता, सत्यम गुप्ता, आदित्य गुप्ता आदी उपस्थित होते.
आढळराव-पाटील म्हणाले, “”कुटुंब व राष्ट्राच्या कल्याणासाठी उत्तर भारतीय महिला निसर्गात आणि समाजात एकरुपता साधत समर्पण भावनेने सूर्य देवतेची उपासना करतात. छटपूजेचे व्रत मनोभावे करतात. यंदा विश्व श्रीराम सेना या राष्ट्रीय संस्थेच्या वतीने मोशी येथे इंद्रायणी घाटावर छट पुजेनिमित्त आयोजित उत्सवात “बेटी बचाओ – नारी शक्ती’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम महिला भगिनींना प्रेरणादायी आहेत.”
लालबाबू गुप्ता म्हणाले की, “”आधुनिक युगात मुलींना शिक्षण आणि संस्काराबरोबरच स्वत:चे रक्षण करण्यासाठी सक्षम करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी प्रथम कुटुंबातील महिलांनी आपल्या मुलींना सुदृढ व शारिरीकदृष्टीने सक्षम करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा.” या उत्सवानिमित्त गुरुवारी सुर्यषष्टी महाव्रत महापूजा, शुक्रवारी छोटकी छट आदी कार्यक्रम झाले. प्रमोद गुप्ता यांनी आभार मानले.