बेकायदा शस्त्र बाळगल्याच्या गुन्ह्याच्या तपासात प्रकार उघड
पुणे – वाढदिवसाच्या बहाण्याने एका अल्पवयीन मुलीला घरात बोलावून तिच्यावर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर आणखी दोघे येणार असल्याचे सांगून तिला अडवण्याचा प्रयत्न केला. तिने नकार देताच तिचा गोळी घालून खून करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने छातीजवळ ठेवलेल्या मोबाईलला गोळी लागल्याने तिचे प्राण वाचले. दुसऱ्या गुन्ह्यात या आरोपींच्या प्रकरणातही धक्कादायक माहिती समजल्यावर मुलीचा शोध घेऊन पोलिसांनी गुन्हा नोंदवला.
श्रीकांत काळे, कृष्णा उर्फ रोहन अशोक ओव्हाळ (24), निरंजन उर्फ निलेश शिंदे (20, रा. वारजे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अन्य दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. यातील श्रीकांत काळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. समोरच्या टोळीकडून जीवाला धोका असल्याने पिस्तूल बाळगले असल्याचा दावा त्याने केला.
वारजेतील एसआरएसच्या इमारतीत घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी जनता वसाहत परिसरात राहते. तिच्या एका मैत्रिणीने तिला आपल्याला मित्राच्या वाढदिवसाला जायचे असल्याचे सांगितले. त्यानुसार या दोघी वारजेत आरोपींसोबत वाढदिवसाला गेल्या. त्याठिकाणी वाढदिवस साजरा झाल्यानंतर त्या मुलीला एका खोलीत नेण्यात आले. तिथे तिघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. त्यानंतर मुलगी घरी जाण्यास निघाली.
पण, आरोपींनी तिला घरी जाऊ नकोस, आणखी दोघे साथीदार येणार आहेत, असे सांगितले. तिने नकार दिला आणि घरी जाण्यास निघाली. यावेळी तिने मोबाइल छातीजवळ ठेवला होता. ती निघाल्याचा राग आल्यावर एका आरोपीने पोटमाळ्यावर ठेवलेली पिस्तूल काढत तिच्यावर गोळी झाडली. गोळी तिच्या छातीत लागली. पण तिथे मोबाइल असल्याने तिला जास्त जखम झाली नाही. यानंतर आरोपी घाबरले. त्यांनी तिच्या दुसऱ्या मैत्रिणीला या मुलीला घेऊन जाण्यास सांगितले. त्या दोघींना कात्रज परिसरात सोडण्यात आले.
…अन् बलात्काराचा गुन्हा उघड
गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पथक गस्त घालत असताना त्यांना 26 मार्च रोजी आरोपी श्रीकांत काळेकडे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्यांना पकडले. त्यांना हे पिस्तूल कोठून आणले आणि कुठे याचा वापर केला याची माहिती मिळवण्यासाठी पोलीस कोठडी घेण्यात आली. पोलीस कोठडीत सामूहिक बलात्कार व गोळीबाराचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी या अल्पवयीन मुलीचा शोध घेत गुन्हा दाखल केला असल्याची माहिती युनिट दोनच्या पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी दिली.