मध्यप्रदेशातून पकडले तीन आरोपी वेशांतर करुन रचला सापळा
पिंपरी – दागिने पळवणाऱ्या सराईत चोरट्यांच्या टोळीतील तीन जणांना पकडण्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांना यश आले आहे. या टोळीने पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या हद्दीमध्ये एका खाजगी खासगी बसमधून 1 कोटी रूपयांचे सोने, हिऱ्यांचे दागिने चोरले होते. सराईत 3 चोरट्यांना पोलिसांनी मध्यप्रदेशातून जेरबंद केले आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट-2 आणि हिंजवडी पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने केली. चोरट्यांकडून 36 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मुस्ताफ समशेर खान (रा. मध्य प्रदेश), राजेंद्र हरिश्चंद्र सोनी (वय 38, रा. धरमपुरी, जि. धार), इस्माईल बाबू खान (वय 33 रा. काळी बावडी, धरमपुरी, जि. धार) या तिघांना अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, 24 फेब्रुवारी 2019 रोजी दिपक पुरुषोत्तमराव सैनी (वय-24, रा. राणीगंज, सिकंदराबाद, तेलंगणा) हे हैद्राबाद येथून कुरियर कंपनीचे सोने, हिऱ्याचे दागिने व रोख रक्कम याचे पार्सल घेऊन खासगी बसमध्ये मुंबईला निघाला होता. दरम्यान चोरट्यांनी पुनावळे येथे बस थांबलेली असताना एक कोटी रुपयांचा ऐवज असलेली बॅग पळवली होती.
हिंजवडी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. त्यानुसार, गुन्हे शाखा युनिट- 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश कांबळे यांनी तपास सुरू केला. दरम्यान गुन्ह्यात सहभागी असलेले चोरटे मध्यप्रदेशातील इटावा, देवास येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखा आणि हिंजवडी पोलिसांनी आपले संयुक्त पथक तयार करून आरोपीच्या शोधासाठी थेट मध्यप्रदेशातील इटावा हे गाव गाठले व वेशांतर करुन आरोपींना अटक केले. आरोपींकडून 731 ग्रॅम वजनाची (किं. 25 लाख रुपये) सोन्याची बिस्किटे व गुन्ह्यात वापरलेली 11 लाख रुपयाची कार असा एकूण 36 लाख रुपयाचा ऐवज जप्त केला. तिन्ही आरोपी सराईत असून त्यांच्यावर तेलंगणा तसेच महाराष्ट्रात आणखी गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त आर.के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस निरीक्षक भानुदास जाधव, पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, उपनिरीक्षक हर्षल कदम, अशोक गवारी, पोलीस नारायण जाधव, संजय गवारे, फारूक मुल्ला, मयुर वाडकर, संदीप ठाकरे, किरण आरूटे, प्रविण दळे, हजरत पठाण, जमीर तांबोळी, तुषार शेटे, लक्ष्मण आढारी, महादेव जावळे, दत्तात्रय बनसुडे, संपत निकम, धर्मराज आवटे, मंहमद गौस नदाफ, नितीन बहिरट, दादा पवार, धनराज किरनाळे, सावन राठोड, सचिन मोरे, राजेंद्र शेटे, महेंद्र तातळे, गणेश मालुसरे, दीपक खरात, प्रमोद हिरळकर, कुणाल, शिंदे, अमर राणे, सुभाष गुरव, रेखा धोत्रे, विकी कदम या पथकाने केली.
आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
गेल्या काही वर्षांमध्ये कुरियरमार्फत मौल्यवान ऐवज घेऊन जाणाऱ्या कुरियर कर्मचाऱ्यांची लूट किंवा चोरी होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. या घटना देशातील कित्येक राज्यात घडल्या असल्याने पकडण्यात आलेल्या आरोपींच्या टोळीचा सूत्रधार, आरोपींना मिळणारी माहिती याबाबत पोलीस तपास सुरु असून इतर राज्यातील काही मोठे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.