पिंपरी – जादा परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक करणार्या साजिद शहा कासम शहा (वय ३०) आणि अभिजित रामराव श्रीरामे (वय ३२ दोघेही रा. संभाजीनगर) या दोन जणांना छत्रपती सभांजीनगर येथून पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर सेल विभागाने अटक केली.
अशी केली फसवणूक
तक्रारदार फेसबुक पाहत असताना शेअर्सबाबतची जाहिरात दिसली. त्यांनी जाहिरीतीमधील लिंकवर क्लिक केले असता त्यांना व्हाटस्ॲप ग्रुपवर जॉईन केले. त्यांनतर तक्रारदारास Kotakzer लिंक पाठवून ॲप करण्यास सांगितले. या ॲपवरून शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानंतर वेगवेगळ्या बँक खात्यावर ७४ लाख रुपये भरण्यास भाग पाडले. ही रक्कम फिर्यादी यांनी परत काढण्याचा प्रयत्न केला असता ती रक्कम काढता आली नाही. आपली फसवणुक झाल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात असल्याने तक्रार दिली.
तांत्रिक विश्लेषण करून काढला माग
या गुन्ह्यातील बँक खात्याचे तांत्रिक विश्लेषन करून आरोपी छत्रपती संभाजीनगरातील असल्याचे निष्पन्न केले. उपनिरीक्षक सागर पोमण यांचे पथक छत्रपती संभाजीनगरमध्ये आले. त्यांनी आरोपी साजिद शहा आणि अभिजित श्रीरामे यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये इतर आरोपींचाही सहभाग असल्याचे दिसून आले आहे.
‘त्या’ बॅक खात्याबाबत ५६ तक्रारी
आरोपीकडून गुन्हयातील तीन मोबाइल फोन जप्त केले. तसेच आरोपींनी वापरलेल्या बँक खात्याबाबत एनसीसीआर पोर्टलवर ५६ तक्रारी अर्ज दाखल आहेत. याच खात्यावरून चार कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचेही दिसून आले.
या पथकाने केली कामगिरी
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त शशिकांत महावरकर, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त संदिप डोईफोडे, सहायक आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे वरिष्ठ निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक निरीक्षक प्रविण स्वामी, उपनिरीक्षक सागर पोमण, अंमलदार दिपक भोसले, अतुल लोखंडे, प्रिया वसावे, अशोक जावरे, श्रीकांत कबुले, अभिजीत उकीरडे यांच्या पथकाने केली आहे.