-वंदना बर्वे
नवी दिल्ली – पश्चिम बंगालमध्ये पुढच्या वर्षी विधानसभेची निवडणूक होणे आहे. अशात, भाजपने निवडणुकीची तयारी युध्द पातळीवर सुरू केली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सत्तेतून बेदखल करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगालमध्ये दिग्गज नेत्यांची फौज तैनात केली आहे.
भाजपने अनेक केंद्रीय मंत्री, उपमुख्यमंत्री आणि पदाधिकाऱ्यांना बंगालच्या मोहिमेवर पाठविले असून प्रत्येकाला पाचसहा मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे.
भाजपातील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, गृहमंत्री अमित शहा या आठवड्याच्या शेवटी पुन्हा एकदा बंगालला जाणार आहेत. याशिवाय केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत, संजीव बलियान, प्रल्हाद पटेल, अर्जुन मुंडा आणि मनसुख मांडविया यांना सुध्दा बंगालच्या दौऱ्यावर पाठविण्यात आले आहे.
उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्या आणि मध्यप्रदेश सरकारमधील ज्येष्ठ मंत्री नरोत्तम मिश्रा यांना पाचसहा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पर्यटन मंत्री प्रल्हाद पटेल प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत.
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा परफॉर्मंस काही चांगला राहिलेला नाही. परंतु, 2019 मधील लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला 18 जागांवर विजय मिळाला होता. यामुळे भाजपच्या अंगात बारा हत्तींचे बळ संचारले आहे.