नाशिक – नाशिकमध्ये मंगळसूत्र चोरणारी परराज्यातील टोळी अखेर जेरबंद करण्यास पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे, गुजरातमधील ही टोळी चारचाकी वाहनातून येत या चो-या करत असत. टोळीला पंचवटी पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत.
जयसिंग यादव (वय 25), पंकज यादव (वय 20), कुलदीप यादव (वय 20) आणि संदीप यादव (वय 28) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी गुजरातमधील सिल्व्हासा (जि. बलसाड) येथील आहेत. त्यांच्याकडून एक लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र पोलिसांनी हस्तगत केले आहे. त्यांनी चारचाकी वाहनासाठी बनावट नंबर प्लेट वापरल्याचे उघड झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सुमन सोमवंशी (वय 65) या आपल्या नातवाला शिंदेनगरातील मखमलाबाद रोडवरील एका कोचिंग क्लासेसमध्ये सोडून परत येत होत्या. तेव्हा त्या कोचिंग क्लासेसच्या बाहेर एक निळ्या रंगाची चारचाकी उभी होती.
त्या चारचाकीमधून एक उंचापुरा आणि पांढराशुभ्र शर्ट घातलेला माणूस बाहेर पडला. त्याने काही कळायच्या आत सुमन शिंदे यांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र ओढले. मात्र, हा प्रयत्न फसल्याने तो आपल्या टोळीसह पसार झाला.
याप्रकरणी सोमवंशी यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक अशोक साखरे यांच्या पथकाने घटनास्थळ गाठले. तिथल्या चौथ्या मजल्यावरील सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले होते. या माहितीच्या आधारे पोलिसांनी हे संशयित वाहन विठ्ठल रुक्मिणी मंगळ कार्यालयाजवळच्या मारुती मंदिरासमोर अडवित आरोपींच्या मुसक्या आवळल्या.