पुणे : नवी पेठेतील सेंट्रल मॉलजवळ दोन विद्यार्थ्यांवर चार जणांच्या टोळक्याने हल्ला केला. यामध्ये एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. भरदुपारी ही घटना घडल्याने परिसरात खळबळ माजली. दरम्यान, आबासाहेब गरवारे महाविद्यालयाने या विद्यार्थ्यांशी आमचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. घटनास्थळी पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल , पोलीस निरीक्षक गिरीशा निंबाळकर दाखल झाल्या होत्या. त्यांनी जखमी विद्यार्थ्याची विचारपूस केली. त्याच्यावर चावीने आणि धारदार वस्तूने हल्ला करण्यात आला. काही जण कोयत्याने हल्ला केल्याने सांगत होते. मात्र, प्रत्यक्षात तसे दिसत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात अल्पवयीन मुलांचे खून झाल्याच्या दोन घटना घडल्या. त्यानंतर ही घटना घडल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.