कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गचा गणेशोत्सव ऐतिहासिक घडवावा

सिंधुदुर्ग : कोकणाचा सर्वात मोठा सण गणेशोत्सव सांघिक पद्धतीने साजरा करणासाठी सरपंचाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव शांततेत, सलोख्यात व सुरक्षित पद्धतीने साजरा करुन सिंधुदुर्गचा गणेशोत्सव ऐतिहासिक घडवावा अशी अपेक्षा पालकमंत्री उदय सामंत यानी व्यक्त केली.

मुंबईवरुन येणारे चाकरमानी हे आपलेच नातलग असून त्यांच्यात आणि गावातील ग्रामस्थांमध्ये सलोख्याचे संबंध निर्माण करण्यात सरपंचाची भूमिका महत्त्वाची आहे. गणेशोत्सव शांततेत आणि सलोख्यात पार पाडण्यासाठी सरपंचांना जिल्हा प्रशासन सर्वेतोपरी सहकार्य करेल असे सांगून पालकमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले, कोरोना काळामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने अत्यंत उत्कृष्टपणे काम केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना बाबतचे काम राज्यातील पहिल्या तीन क्रमांकात गणले जात आहे. ही अत्यंत चांगली बाब आहे, असे सांगुन पालकमंत्री म्हणाले, मुंबईवरुन येणारे चाकरमानी यांना दहा दिवस क्वॉरंन्टाईन करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन गणेशत्सव साजरा करुन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक आदर्शवत सामाजिक काम होऊन महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्हा इतिहास घडवेल असे काम करुया असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

जिल्ह्यातील सर्व रस्ते ८ दिवसात दुरूस्त करा….

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये चाकरमान्यांबरोबरच त्यांची वाहनेही येणार आहेत. त्यामुळे रस्त्यावर वर्दळ वाढणार असून जिल्ह्यातील सर्व रस्ते ८ दिवसांच्या आत दुरूस्त करावेत. त्याचबरोबर पावसामुळे कोणत्याही प्रकारचे रस्ते बंद राहू नयेत, याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना देऊन पालकमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले, जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. महामार्गावर बहुतांश ठिकाणी वळण रस्ते (डायव्हर्जन) वाहन चालकाला दिसतील या प्रमाणे करुन घेण्यात यावीत. उर्वरित अन्य कामे येत्या आठवडाभरात करण्यात यावी. या कामाची मी स्वत: पाहणी करणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने प्रलंबित कामे पूर्ण करुन घ्यावीत. जिल्ह्यातील बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम यांनी जिल्हा मार्ग व ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यांना जोडणारे रस्तेही तातडीने दुरुस्त करावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १५ ऑगस्ट या दिवशी आंदोलकांनी किंवा उपोषण कर्त्यांनी उपोषण व आंदोलन करू नये असे आवाहनही त्यांनी यावेळी जिल्हावासियांना केले.

गणेशोत्सवाच्या अनुषंगाने नियोजन समितीच्या नवीन सभागृहात सरपंच संघटनेच्या प्रतिनिधीसोबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, सुशांत खांडेकर, वंदना खरमाळे, सर्व तहसीलदार, पोलीस ठाण्यांचे प्रमुख व विभाग प्रमुख तसेच विविध गावांचे सरपंच उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.