महाराष्ट्रातील गणेशोत्सव

गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सगळ्यांत मोठा उत्सव आहे. दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस अथवा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीस हा उत्सव येतो. भारतीय पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्‍ल चतुर्थीपासून गणेशोत्सवाला सुरुवात होते. दहा दिवस अगदी चैतन्याच्या आणि भक्‍तिमय वातावरणात हा उत्सव संपन्न होतो. अनंतचतुर्दशीच्या दिवशी श्री गणेशाच्या मूर्ती विसर्जित केल्या जातात.

पूर्वी केवळ घरगुती व्रत/उत्सव अशा स्वरूपात असलेल्या गणेशोत्सवास लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक स्वरूप दिले. पुण्यातील गणपती त्यांच्या पारंपरिक स्वरूपामुळे तर मुंबईचे गणपती त्यांच्या भव्यतेमुळे अत्यंत देखणे आणि आकर्षणाचा विषय ठरतात. त्यामुळेच गणेशाच्या या उत्सवाला महाराष्ट्रात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होते.

महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांतही भाद्रपद शुक्‍ल चतुर्थीपासून गणेशोत्सवाला सुरुवात होते. मात्र, हा उत्सव बहुतांशपणे घरगुती आणि धार्मिक विधी स्वरूपात संपन्न होतात.
बंगालमध्ये दुर्गापूजेच्या काळात गणपतीचीही पूजा केली जाते. गोवा राज्यातही गणेशाची पूजा मोठ्या
उत्साहात केली जाते. महाराष्ट्राबाहेर मध्य प्रदेशातील उज्जैन, रायपूर, राजस्थानातील जोधपूर, बिहारमधील वैद्यनाथ, गुजरातमधील वलसाड, धोळका आणि बडोदा, उत्तर प्रदेशातील वाराणसी
येथील धुंडीराज मंदिर आदी भारतातील उल्लेखनीय मंदिरे आहेत.

दक्षिण भारतातील गणेश मंदिरांमध्ये तमिळनाडू राज्यातील तिरुचिरापल्ली येथील जम्बुकेश्‍वर मंदिर, रामेश्‍वरम व सुचिन्द्रम येथील मंदिर, कर्नाटकातील हंपी व इडागुंजी येथील, आंध्र प्रदेशातील द्राचलमचे मंदिर आणि केरळच्या कासारगौड येथील मंदिरे विशेष उल्लेखनीय आहेत. भारताबाहेर नेपाळ
येथेही अनेक मंदिरे आहेत.

आपले सर्व सण पर्यावरणपूरकच आहेत. तसेच भारत हा कृषिप्रधान देश आहे. आपल्याकडे शेतकरी त्याच्या शेतजमिनीला काळी आई म्हणतात. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे पार्थिव गणपतीचे पूजन करावे. याचाच अर्थ मातीच्या गणपतीची मूर्ती घडवावी, तिची प्रतिष्ठापना आणि पूजन करावे आणि त्याचेच विसर्जन करावे. हीच माती काळ्या मातीत एकरूप होऊन जाते. त्यामुळे पाण्यात न विरघळणारी मूर्ती टाकून केले जाणारे प्रदूषण सहजपणे टाळता येते. पर्यावरणाचे रक्षण होते.

पूर्वी गणपतींची संख्या कमी होती. आता गावांत, शहरांत, कॉलनीत, गल्लीत, पेठेत अनेक मंडळे बाप्पांची प्रतिष्ठापना करतात. त्यानुसार मूर्तींची संख्या वाढते. मूर्ती भव्य आणि आकर्षक असतात. मात्र, पर्यावरणाशी सौहार्द जपणाऱ्या त्या नसतात. याचाच अर्थ आपण आपल्या सणांनी निसर्ग जोपासण्याचा दिलेला मंत्र अव्हेरून निसर्गाच्याच विरोधात जाणाऱ्या गोष्टी करतो आणि आपल्यासमोरची संकटे वाढवून ठेवतो. याला कुठेतरी पायबंद घालता येईल. काळानुसार ही जबाबदारी आता आपल्या सर्वांवर आली आहे. शाडू माती वापरा. नैसर्गिक रंग वापरा अन्‌ भक्‍तिभावासह पर्यावरणही जपा.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.