गणेशोत्सव हवा इकोफ्रेंडली

गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!! असे म्हणत गेल्या वर्षी निरोप दिलेल्या गणरायाचे पाहता पाहता आता पुनरागमन होईल. घरातील मूर्ती “अंगुष्टप्रमाण ते हस्तप्रमाण’ आणि सार्वजनिक ठिकाणी बसवायची मूर्ती “हस्तप्रमाण ते मानुक्षप्रमाण’ एवढी असावी. पण अनेकजण या शास्त्रवचनाकडे दुर्लक्ष करतात. उगीचच 12, 15 फुटी गणेश मूर्ती बसवल्याने त्याचा संभाळ करणे दैनंदिन पूजा करणे, विसर्जन करणे यात अडचणी येतात. तेव्हा शास्त्रात जे प्रमाण सांगितले आहे त्याच प्रमाणात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करणे आवश्‍यक आहे.

निसर्ग हेच गणेशाचे रूप आहे. मात्र याच निसर्गाच्या विरोधात आताचा गणेशत्सव साजरा होत आहे. मुळात गणपती माता पार्वतीने मातीपासून बनविलेला आहे, असा उल्लेख पुराणात आहे. मूर्तीला नैसर्गिक रंगाऐवजी रासायनिक रंग वापरले जातात. त्यात शिसे, कार्बन आणि पारा यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. यामुळे श्‍वसनाचे आणि त्वचेचे विकार उद्‌भवतात. गणपतीचे मखर सुंदर व्हावे म्हणून आपण थर्माकोलचा वापर करतो.

थर्माकोल म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरिस या राक्षसाचा जुळा भाऊ आहे. थर्माकोलचे विघटन होत नाही. त्याचे तुकडे इकडे तिकडे पडतात. प्लॅस्टिकच्या फुलामाळांचेही तसेच होते. गणपतीच्या मंडपात प्लॅस्टिकला हद्दपार करणे हे आवश्‍यक आहे. गणेशमूर्ती शाडू किंवा मातीने बनविल्या असतील आणि प्रमाणबद्ध असेल तरच खरेदी करावी. कागदाचा लगदा आणि शाडूची माती पाण्यामध्ये सहज विरघळतात या मूर्तींच्या किमती फार कमी असतात.

गणेशमूर्तींचे विसर्जन हे मोठ्या जलाशयात किंवा वाहत्या पाण्यात करावे असे शास्त्र सांगते; परंतु आजची नद्यांची स्थिती आणि पाणी प्रदूषणाचा विचार करता हौदात किंवा कृत्रिम तलावात गणेशमूर्तींचे विसर्जन करणे उत्तम. याखेरीज घरातच एखाद्या बादलीत मूर्तीचे विसर्जन केले आणि मूर्ती पूर्ण विरघळल्यानंतर ते पाणी झाडांना घातले तरीही चालू शकते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.