शिरूर : कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी गणेश उत्सव व पैगंबर जयंती मिरवणूक डीजे मुक्त करायचे असेल तर गणेश मंडळाचे पदाधिकारी व नागरिकांनी पुढाकार येऊन डीजे मुक्त गणेश उत्सव साजरा करूया. परंतु डीजे वाजला तर डीजे जप्त करून कडक कारवाई केली जाईल असा इशारा शिरूर उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांनी दिला असून हे उत्सव सामाजिक सलोखा ठेवून साजरे करावे असे आवाहन केले. तर डीजे मुक्त गणेशोत्सव करण्यासाठी लवकरच गणेश मंडळ व स्थानिक नागरिक यांची बैठक घेणार असल्याचे ढोले यांनी सांगितले.
येणारा गणेशोत्सव व पैगंबर जयंती (ईद ए मिलाद) च्या अनुषंगाने शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता कमिटी, गणेश मंडळ, मुस्लिम समाजाचे पदाधिकारी, पत्रकार, यांची बैठक बोलावली होती. यावेळेस उपविभागीय अधिकारी ढोले बोलत होते. यावेळी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र धनक, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष नामदेवराव घावटे, माधव सेनेचे रवींद्र सानप, महिला दक्षता कमिटीचा जिल्हा सदस्य शोभनाताई पाचंगे, माजी नगरसेवक अबिद शेख, आप पक्षाचे अनिल डांगे, प्राध्यापक ईश्वर पवार, प्राध्यापक विलास आंबेकर, ॲड. किरण आंबेकर, आदिशक्तीच्या अध्यक्ष शशिकला काळे,डॉ. वैशाली साखरे,हाफीज बागवान, राहील शेख, सविता बोरुडे, संदीप कर्डीले, उमेश शेळके, शिरूर नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक डी बी बर्गे , निलेश जाधव मोठ्या प्रमाणात शहरातील हिंदू मुस्लिम नागरिक उपस्थित होते.
गणेश उत्सव व पैगंबर जयंती हे दोन्ही सण आपल्या सर्वांच्या अस्मितेचे आहे. यासाठी शहरामध्ये कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी पोलिसांबरोबर गणेश मंडळ, मुस्लिम समाजाची कार्यकर्ते यांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. यामुळे गणेशोत्सव पैगंबर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करणार असून यासाठी सर्वांनीच कायदा सुव्यवस्था व सामाजिक बांधिलकी राखावी असे आवाहनही ढोले यांनी केले आहे. तर गणेश मंडळांनी आपल्या गणेश मंडळ मंडपामध्ये सीसीटीव्ही लावल्यास कुठलाही अनुचित प्रकार घडण्या अगोदर आपल्याला माहिती मिळेल किंवा कोणी केले हे माहिती कळेल त्यामुळे सत्य समोर येण्यास व कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यास मदत होणार आहे.
शाळा कॉलेज यामध्ये मोठ्या प्रमाणात शालेय मुलींची छेडछाडीचे प्रमाण वाढले आहे त्यासाठी शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्याला होणाऱ्या त्रासाबाबत शाळेच्या तक्रार पेटीमध्ये तक्रार टाकावी त्यात संबंधित व्यक्तीचे नावही लिहावे असे केल्यास संबंधित व्यक्तीवर शाळा कॉलेजच्या मदतीने कारवाई करण्यात येईल. त्यासाठी शाळांनी मुलांमध्येही प्रबोधन करणे गरजेचे आहे.
येणारा गणेशोत्सव व पैगंबर जयंती हे दोन्ही उत्सव सण आपण सर्वांनी एकत्रित व शिरूर शहरातील जातीय सलोख्याची परंपरा कायम ठेवून साजरे करूया असे आवाहन शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी केले आहे. यावेळी शिरूर शहरातील नागरिकांनी मुलींची छेडछाड, गणेशोत्सव काळात डीजेच्या आवाजामुळे होणारा त्रास, अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवणे, गल्लोगल्ली सुरू असणारे रस्ता अडवून गाड्यांवर केक कापणे बंद करावे, बाबुराव नगर रस्त्यावर तरुणांकडे धारदार शस्त्र असून, या सर्व तक्रारी आल्या आहेत.