गणेश मूर्ती रंगरंगोटीला वेग

महाळुंगे इंगळे -संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात तितक्‍याच भक्तीभावाने साजरा केला जाणारा व तमाम गणेश भक्तांचे आराध्य दैवत असणारा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपल्याने गणेश मूर्तींचे रंगरंगोटीच्या कामांना वेग आला आहे. अशी माहिती खालुंब्रे (ता. खेड) येथील श्रुती आर्टस्‌ या गणेश मूर्ती कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालिका व सरपंच सोनल अविनाश बोत्रे यांनी दिली.

स्वतःच्या कलेतून अपार मेहनत करून साकारलेल्या हजारो आकर्षक व सुबक गणेश मूर्तींना संपूर्ण पुणे जिल्ह्यासह अन्य भागातून यंदा प्रचंड मागणी असल्याने मूर्तींच्या कारखान्यावर गणेशमूर्तींची नोंदणीसह खरेदी करण्यासाठी गणेश भक्तांची गेल्या महिनाभरापासून वर्दळ आहे. गेल्या दहा वर्षांपासून सरपंच सोनल बोत्रे ह्या स्वतः आकर्षक व सुबक गणेशमूर्ती तयार करण्याला प्राधान्य देत आहेत. गेल्या काही वर्षांपासून मूर्ती बनविण्याची कला बोत्रे यांनी जोपासली आहे.

प्लॅस्टर ऑफ पॅरिस तसेच रंग कामाचे इतर साहित्य त्यांनी पुणे, मुंबई व राजस्थान येथून आणून मूर्ती बनविण्याचे काम वेगात सुरु केले आहे. मार्च महिन्यांपासून मुर्ती बनविण्यास ऊन, वारा व पाऊस यांचा अंदाज घेवून तब्बल चार हजाराहून अधिक बहुरंगी मुर्ती बनविल्या असल्याचे सरपंच सोनल बोत्रे, युवा उद्योजक अविनाश बोत्रे व सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बोत्रे यांनी सांगितले. जय मल्हार, दगडू हलवाई गणपती, टिटवाळा गणपती, सोंडेचा गणपती, महिरपी सिंहासन आदी प्रकारच्या गणरायाची मुर्ती गणेश भक्तांचे लक्ष वेधून घेत आहेत. गणेश भक्तांच्या आवडी निवडीला वाव देत लक्षवेधी शिवराज्याभिषेक सोहळा ही सुबक व आकर्षक प्रत मूर्तीच्या माध्यामातून साकारली आहे. सर्व प्रकारच्या चार हजारांहून अधिक मूर्ती तयार होऊन रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यात आले आले आहे.

गतवर्षींच्या तुलनेत यंदा किमतीत वाढ
यंदा गणेशमूर्तींच्या किमतीत गतवर्षीच्या तुलनेत मोठी वाढ झाली असली तरी या ठिकाणी गणेश भक्तांचा उत्साह पाहून अल्पदरात गणेश मूर्तींची विक्री केली जाणार आहे. एक फूटापासून अकरा फूट उंचीच्या यंदा हजारो मूर्ती बनविण्यात आल्या असून, त्या मूर्ती बाजारात अगदी एकशे एक रूपयापासून एकवीस हजार रूपयांपर्यंत विकल्या जाणार असल्याचा सोनल बोत्रे यांचा अंदाज आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)