बाप्पाच्या स्वागतासाठी जिल्हा सज्ज : पूर्वसंध्येला बाजारपेठांमध्ये उसळली गर्दी
बारामती – विघ्नहर्त्या गणरायाच्या स्वागतासाठी पुणे जिल्हा सज्ज झाला असून “श्रीं’च्या सजावटीच्या साहित्यांनी बाजारपेठ बहरली आहे. कोणत्या रुपातील विघ्नहर्त्यांला घरी विराजमान करावयाचे याचा विचार करीत साहित्यांच्या खरेदीसाठी गणेशचतुर्थीच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या होत्या. बाप्पांच्या स्वागतासाठी सजावटीच्या वैविध्यपूर्ण शोभेच्या वस्तूंची बाजारपेठेत गर्दी झाली आहे. तर, मंडळाचे कार्यकर्ते मंडप सजावटीत दंग झाले होते. जय मल्हार, बाहुबली, सेल्फी काढणारा गणेश, शिवरुपी, मूषकारुढ, मोरावरचा गणपती अशा विविध मूर्तीची छाप असून याच मूर्तीना मागणी अधिक आहे.
लाडक्या बाप्पाच्या स्वागताची गणेशभक्तांकडून सुरू असलेली तयारी संपली असून, दहा दिवसांच्या उत्साहासाठी बारामतीनगरी सजली आहे. यामुळेच गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत रविवारी (दि. 1) गर्दी उसळली होती. दरम्यान, गेल्या दोन तीन दिवसांपासून बारामतीत पावसाने हजेरी लावली असली तरी पावसाचा खरेच्या उत्सवावर कोठेही परिणाम झालेला दिसला नाही.
बुद्धीचा देवता आणि मांगल्याचे प्रतिक समजल्या जाणाऱ्या लाडक्या बाप्पाचे सोमवारी (दि. 2) आगमन होणार आहे. त्याच्या स्वागतासाठी बारामती नगरातील घरगुती गणेशभक्तांसह मंडळेही अक्षरशः आतुर झाली आहेत. घर व मंडळाच्या ज्या जागी बाप्पाची प्रतिष्ठापना होणार आहे, त्या जागेला मनपसंतीच्या आरास साहित्याने सजविण्यात गणेशभक्त, कार्यकर्ते रविवारी दिवसभर व्यस्त होते. दुसरीकडे अनेक गणेशभक्त वेळात वेळ काढून गणेशमूर्तींचे बुकींग करण्यासाठी मूर्तीच्या दुकानात तर काही कुंभार गल्लीमधे दाखल झाले होते. तर आज बाप्प बुकिंग केल्यानंतर सोमवारी बाप्पांची घरोघरी व मंडळांमध्ये प्रतिष्ठापना होणार आहे. त्यामुळे बाजारपेठेत व कुंभार गल्लीच्या आसपास भगवी रिबन, श्रीफळ, अगरबत्ती, गुलाल, उर्पण आदी वस्तूंचे विक्रेत्यांनी अनेक स्टॉल उभारले असून सोमवारी यात आणखी भर पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, गणेशोत्सव काळात विविध सामाजिक उपक्रम राबविण्याची परंपरा यंदाही बारामतीतील मंडळांनी जपली आहे. मात्र यंदा महापुरामुळे अनेकांनी सामाजिक उपक्रम रद्द करुन पुरग्रस्तांना मदतीचा हात देण्याचे ठरविले आहे.
असे असले तरी मंडळांनी बाजारपेठेतून पार लाईट, फोकस, विजेच्या माळा, रंनींग लाईट, रंगीत बल्बची मात्र मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याचे इलेक्ट्रीकल दुकानदारांनी सांगितले. आवडलेली मूर्ती बुकिंगसाठी स्टॉल्सवर रात्री उशिरापर्यंत गर्दी होती. शहरातील विविध ठिकाणी गणेशमूर्ती विक्रीसाठी मंडप उभारण्यात आले असून याठिकाणी घरगुती गणपतीपासून मोठ्या सार्वजनिक गणपतीपर्यंत सर्व प्रकारच्या गणेशमूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
वाद्य पथकेही सज्ज
“श्रीं’ना वाजत-गाजत घरी नेण्याची हौस लक्षात घेऊन बारामतीतील अनेक पारंपरिक वाद्य पथकांचे बुकिंग झाले असून हे पथकेही “श्रीं’ना वाजत गाजत घरोघरी व मंडळांमध्ये पोहोचवण्यासाठी सज्ज झाले आहेत.