पुणे – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने यंदाचा गणेश जन्म सोहळा माघ शुद्ध चतुर्थी म्हणजेच शुक्रवार, 4 फेब्रुवारी रोजी बुधवार पेठेतील दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला आहे.
विनायक अवतार असलेला हा गणेशजन्म सोहळा दुपारी 12 वाजता होणार आहे. यंदा स्वराभिषेक, गणेशयाग, श्री गणेश जागर असे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत.
शुक्रवारी पहाटे 3 वाजता ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक होणार आहे. त्यानंतर पहाटे 4 ते सकाळी 6 यावेळेत प्रख्यात गायक अवधूत गांधी हे श्रीं चरणी स्वराभिषेकातून गायनसेवा अर्पण करणार आहेत. सकाळी 8 ते 11 आणि दुपारी 2 ते सायंकाळी 5 यावेळेत गणेश याग होईल. मुख्य गणेशजन्म सोहळ्याला दुपारी 12 वाजता सुरुवात होणार आहे.
यामध्ये पारंपरिक वेशात महिला सहभागी होणार आहेत. जन्माच्या वेळी पुष्पवृष्टी देखील करण्यात येणार आहे. यावेळी गणेशाची मंगलआरती होईल. नगरप्रदक्षिणा सायंकाळी 6.30 वाजता दगडूशेठ गणपती मंदिरापासून कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरापर्यंत जाणार असून तेथे पादुका पूजन होईल.