पालिकेच्या मालमत्ता विभागाकडून वाढीव भाडेदर
यंदा मोकळे मैदान, शाळांच्या आवारात स्टॉल
पुणे – मागीलवर्षी लांबलेला पाऊस, पाठोपाठ करोना यामुळे अनेक व्यवसायांसोबतच गणेश मूर्तीकार आणि विक्रेत्यांनाही फटका बसला आहे. या नैसर्गिक संकटांबरोबर आता या विक्रेत्यांवर महापालिकेच्या स्टॉल भाड्याचे संकट कोसळले आहे. मूर्ती विक्रेत्यांना रस्त्याऐवजी मोकळ्या मैदानात किंवा शाळांच्या आवारात स्टॉल देण्याचा निर्णय महापालिकेने घेतल्याने व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली आगामी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर 22 आणि 24 जुलै रोजी पक्षनेते, पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत बैठका झाल्या. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गणेशोत्सव साधेपणाने साजरे करण्याचा निर्णय घेतानाच गर्दी टाळण्यासाठी काही सूचनाही करण्यात आल्या आहेत. यामध्ये अगदी गणेशमूर्ती विक्री करणाऱ्या स्टॉलबाबतही निर्णय घेण्यात आला. दरम्यान, या नियमांमुळे आता गणेशमूर्ती महागणार असल्याने त्याचा भार थेट ग्राहकांवर पडणार आहे.
महापौर म्हणाले…
– गणेशमूर्ती विक्री करण्यासाठी ऑनलाइन विक्री करण्याला प्राधान्य द्यावे.
– आगमनाच्या 5 ते 10 दिवस अगोदर नागरिकांनी गणेशमूर्ती घरी घेऊन जावी, याबाबत जागृती करावी.
– रस्ता, पदपथांवर स्टॉल उभारण्यास परवानगी देऊ नये.
– अनधिकृत स्टॉल उभे राहणार नाहीत, याची संबंधित क्षेत्रीय कार्यालयांनी दक्षता घ्यावी.
– प्रतिबंधित क्षेत्र आणि त्या बाहेर गणेशमूर्ती स्टॉलसाठी जवळपासच्या शाळेची मैदाने उपलब्ध करून द्यावीत.