पारनेर – गणेशोत्सवानिमित्त विविध मंडळे गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करून विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतात. संबंधित मंडळांनी ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी केले आहे.
पारनेर तालुक्यात अनेक लहान-मोठी गणेश मंडळे आहेत. मात्र ते गणपती मूर्ती प्रतिष्ठापना करण्याची व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी घेत नाहीत. त्यामुळे पोलिसांना या मंडळांवर लक्ष ठेवता येत नाही. कुठला अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मंडळांनी नोंदणी केल्यास खबरदारी बाळगणे सोपे होते.
गणेशोत्सवात सहभागी होणाऱ्या मंडळांनी ऑनलाइन परवानगी घ्यावी, अशा सूचना पोलीस महासंचालकांनी दिल्या आहेत. त्यामुळे पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गणेश मंडळांनी डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू महापोलीस डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट एन या संकेत स्थळावर जाऊन सर्व आवश्यक कागदपत्रासह नोंदणी करावी. जेणेकरून गणेश मंडळांची गैरसोय होणार नाही, असे पवार म्हणाले.