खेलो इंडियात वेट लिफ्टिंगमध्ये उचलले 250 किलो वजन : कांस्यपदकाचा मानकरी
श्रीगोंदा – केंद्र सरकारच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर आयोजित केलेल्या ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत गणेश बायकर याने श्रीगोंद्याचे नाव देश पातळीवर झळकविले आहे. वेट लिफ्टिंग मध्ये 250 किलो वजन उचलत त्याने कांस्यपदक पटकाविले.
गणेशने वेटलिफ्टिंगमध्ये अनेक स्पर्धांत विजयश्री खेचून आणली आहे. तो श्रीगोंद्या जवळील वडाळी येथील रहिवासी असून, वडील दिगंबर बायकर हे प्रगतिशिल शेतकरी आहेत. येथील स्वराज्य प्रतिष्ठानच्या आर. पी. भयानी व्यायाम शाळेपासून त्याने व्यायामास सुरवात केली होती. ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी नॅशनल स्पोर्ट फेडरेशनच्या वतीने निवड स्पर्धा घेण्यात आली. बिहार येथील बोधगया येथे झालेल्या या स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये देशभरातून 27 जण सहभागी झाले होते.
पैकी 5 जणांची ‘खेलो इंडिया’साठी निवड करण्यात आली. त्यात गणेशने स्थान पटकाविले. गोहत्ती (आसाम) येथे नुकत्याच ‘खेलो इंडिया’ स्पर्धा पार पडल्या. यामध्ये 73 किलो वजनगटात गणेशने तब्बल 250 किलो वजन उचलत कांस्यपदक पटकाविले. आर्मीमधील व ओरिसा येथील युवकांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक जिंकले. गणेशने वेटलिफ्टिंगमध्ये कांस्यपदक मिळवत, श्रीगोंद्याचेच नव्हे तर महाराष्ट्राचे नाव देश पातळीवरील उंचावले. या यशाबद्दल सर्वच स्तरातून गणेशवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दरमहा मिळणार शिष्यवृत्ती..!
गणेश बायकर वेट लिफ्टिंगमध्ये तिसरा आला. त्याच्या नावावर कांस्यपदक तर कोरले गेलेच. शिवाय पन्नास हजार रुपयांचे रोख बक्षीस मिळाले आहे. त्या प्रमाणेच ‘खेलो इंडिया’चे प्रमाणपत्र आल्यानंतर महिन्याला दहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती त्यास मिळणार आहे.