पुणे –महापालिकेतील प्रत्येक विकास प्रस्तावाला विरोध करण्याचे धोरण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आणि नगरसेवक प्रशांत जगताप राबवत आहेत. पुणेकरांच्या विकासाला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मोठा ताप ठरत आहेत, अशी खोचक टीका भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि महापालिकेतील भाजपचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी संयुक्त निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटले आहे की, महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत जगताप यांनी उशिराने विरोध केलेल्या प्रस्तावांना पालिकेतील त्यांच्याच पक्षाच्या इतर पदाधिकाऱ्यांनी आधी मान्यता दिली आहे. यामुळे वारंवार पुण्याच्या विकासाच्या विषयावर राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील मतभेद समोर येत आहेत.
पुणे महापालिकेत सर्व पक्षांमध्ये विकासाप्रती असलेले सौहार्द नष्ट करण्याचा विडा जगताप यांनी उचलला आहे. त्यांच्याच पक्षातील सदस्यांचे विकासाबद्दलचे धोरण सुस्पष्ट असताना केवळ आणि केवळ पुढारपणापोटी त्यांनी पुण्याचा विकासाला सुरुंग लावण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेत शहराच्या सामान्य नागरीकांचा विचार व्हावा, यासाठी सर्व समित्यांमध्ये सर्व पक्षाचे प्रतिनिधी घेतलेले असतात. सर्वांनी मिळून शहर घडवावे, असा विचार त्यामागे असतो. जगताप यांनी शहर बिघडवण्याचा उद्योग मांडला आहे.
जगताप यांनी महापौर म्हणून काम केले आहे. त्यांना शासकीय कामाची पद्धत माहिती असावी, असा आमचा समज आहे. शासकीय कामे निविदा प्रक्रियेतून होतात. हे काम ऑनलाइन होते. त्यामध्ये पारदर्शकता असते. मात्र, कुठलेही टेंडर आले की, विरोध करण्यास जगताप यांनी सुरुवात केली आहे. जगताप यांची विकासाची व्याख्या काय आहे, हा प्रश्न पुणेकरांना पडला असल्याची टीका भाजपने केली आहे.
महापालिकेतील सर्व निविदांना जगताप विरोध करतात. परंतु, याच निविदांच्या मान्यतेला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सभासद हे एकमताने पाठींबा देतात. विरोधी पक्षनेत्यादेखील जगताप यांच्याबरोबर नसतात. पालिकेतील विरोधी पक्षनेत्या तसेच विविध समित्यांमधील राष्ट्रवादीचे सभासद त्यांच्या या मनमानी कारभाराला वैतागले आहेत.
– गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महापालिका