“मोदीजींच्याच फोनवरुन गांधीजी आफ्रिकेतून सावरकरांशी बोलले असतील”; काँग्रेसची उपरोधिक टीका

मुंबई  : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी महात्मा गांधींच्या सांगण्यावरून दया याचिका वीर सावरकरांनी दाखल केली होती असे म्हटले आहे. यावरुनच आता काँग्रेसने सिंह यांच्यासहीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे. महात्मा गांधींबद्दल चुकीची माहिती न पसरवण्याचे आवाहन करतानाच काँग्रेसने भाजप आणि मोदींना उपरोधिक टोलाही लगावला आहे.

राजनाथ सिंह यांच्या या वक्तव्यावरुन आता काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सिंह यांच्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत उपरोधक टीका केली आहे. “असं वाटतंय की सर्व भाजपावाल्यांचं डोकं फिरलं आहे. महात्मा गांधींची विचारसणी सत्य आणि अहिंसेवर आधारित होती. सत्य म्हणजेच राम, सत्य म्हणजेच जीवन आणि सत्य म्हणजेच धर्म अशी त्यांची विचारसणी होती. त्यामुळे त्यांच्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याऐवजी त्यांना शरण जाणंच योग्य आहे,” असे म्हटले आहे.

“राजनाथ सिंहजी, महात्मा गांधींना सम्राज्यकर्ते, जगावर राज्य करणारे आणि ज्यांच्या सम्राज्यावर सूर्य कधी मावळत नाही असे इंग्रज जिंकू शकले नाहीत. तुम्ही कशाला त्यांना जिंकण्याचा प्रयत्न करता? खोटं ठरवण्याचा प्रयत्न करता किंवा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न का करता?,” असा प्रश्नही लोंढे यांनी उपस्थित केला आहे.

“तुम्ही इतक्या हस्यास्पद गोष्टी करता की असं वाटायला लागतं की जेव्हा जगामध्ये डिजीटल कॅमेरा नव्हता तेव्हा मोदींनी डिजीटल कॅमेराने फोटो काढला होता, जगामध्ये ईमेल नव्हता तेव्हा त्यांनी ईमेल वापरला होता. त्याचप्रमाणे कदाचित मोदींजींच्याच फोनवरुन गांधीजी आफ्रिकेतून सावरकरांशी बोलले असतील, की तुम्ही माफी मागा,” असा टोला लोंढे यांनी लगावला आहे.

“सत्य हे आहे महात्मा गांधी ९ जानेवारी १९१५ रोजी भारतामध्ये आले आणि सावरकरांनी पहिली माफी १९११ साली मागितली होती. त्यामुळे थोडा इतिहास वाचा. जे तुमचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं चुकीचं तत्वज्ञान आहे त्यामागे गेल्याने आपली काय अवस्था होऊ शकते याची जाणीव करुन घ्या,” असा सल्लाही लोंढे यांनी दिला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.