कोकणचे गांधी : अप्पासाहेब पटवर्धन

4 नोव्हेंबर हा कोकणचे गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांचा जन्मदिवस. 4 नोव्हेंबर 2019 या दिवशी अप्पांच्या जन्माला 125 वर्षे होत आहेत. त्यानिमित्ताने हे लेखन. अप्पांचे पूर्ण नाव सीताराम पुरुषोत्तम पटवर्धन. पण पुढे त्यांना कोकणचे गांधी हे नामाभिधान त्यांच्या सेवेचे प्रतीक आहे.

4 नोव्हेंबर हा कोकणचे गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांचा जन्मदिवस. 4 नोव्हेंबर 2019 या दिवशी अप्पांच्या जन्माला 125 वर्षे होत आहेत. त्यानिमित्ताने हे लेखन. अप्पांचे पूर्ण नाव सीताराम पुरुषोत्तम पटवर्धन. पण पुढे त्यांना कोकणचे गांधी हे नामाभिधान त्यांच्या सेवेचे प्रतीक आहे.आप्पांचे जन्मगाव रत्नागिरी जिल्ह्यातील आगरगुळे. त्यांच्या आईला “बाया’ म्हणत. बायाला एकूण 11 अपत्ये झाली. त्यातील अप्पा पाचवे. अप्पांचे प्राथमिक शिक्षण आगरगुळ्याला झाले. माध्यमिक शिक्षण त्यांनी रत्नागिरीच्या नागू हायस्कूलमध्ये घेतले. तेथे ते बायोआतेकडे राहात. स्कॉलरशिपच्या पैशावर त्यांनी शिक्षण घेतले. हायस्कूलमध्ये शिकत असताना त्यांनी तालीम, खेळ, वक्तृत्व व अवांतर वाचन या गोष्टींची कमाई केली.

उच्चशिक्षणासाठी अप्पा मुंबईला गेले. कॉलेजचे शिक्षण घेत असतानाच त्यांनी रत्नागिरी सहायक मंडळ, गुजराथ दुष्काळ निवारण फंड, कॉलेज जिमखाना कमिटी, कॉलेजचे त्रैमासिक यात सक्रिय सहभाग घेतला. 1916 साली अप्पा बी. ए. झाले. त्यांनी एम. ए. लाही प्रवेश घेतला, पण एम. ए. पूर्ण होण्याआधीच त्यांना पुण्याच्या एस.पी. कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी मिळाली. अप्पा अवलिया होते. एम.ए.चा अभ्यास करत असताना त्यांनी बी.ए.चे प्रमाणपत्र एम.ए.च्या एका पुस्तकाला कव्हर म्हणून वापरले. पुण्यात प्राध्यापकी सुरू होती. वय तरुण होते. लग्न करावे की नाही याविषयी साशंकता होती. त्याच काळात अप्पांनी एक रोजनिशी विकत घेतली. त्या रोजनिशीवर समर्थ रामदासांचे चित्र होते. ते चित्र पाहून त्यांनी लग्न न करण्याचा निश्‍चय केला.

त्याच काळात 1919 साली देशात रौलट ऍक्‍ट म्हणजे काळा कायदा आला. त्याला विरोध करण्यासाठी गांधीजींनी आंदोलन पुकारले. गांधीजींच्या हाकेला ओ देऊन अप्पांनी प्राध्यापकी सोडली. ते तडक मुंबईला जाऊन गांधीजींना भेटले. गांधीजींनी त्यांना “यंग इंडिया’ या साप्ताहिकाचे काम पाहण्यास सांगितले. अप्पा यंग इंडियाचे काम पाहू लागले. पुढे अप्पा साबरमतीच्या सत्याग्रह आश्रमात गेले. तेथील राष्ट्रीय विद्यालयात ते इंग्रजी विषयाचे अध्यापन करू लागले आणि आश्रमापासून तीन मैल दूर असलेल्या कॉलेजमध्ये “तर्कशास्त्र’ हा विषय शिकवू लागले. मात्र, कॉलेजला ते पायीच जात. जाता येता त्यांना 6 मैल पायपीट करावी लागे, पण त्यांनी स्वदेशीचे व्रत घेतल्यामुळे परदेशी बनावटची सायकल वापरायला नकार दिला. सत्याग्रह आश्रमात त्यांना पंडित नेहरू, रवींद्रनाथ टागोर, राजाजी यांचा अल्प सहवास लाभला. पुढे अप्पा रत्नागिरीला आले. 1923 च्या झेंडा सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला. रत्नागिरीमध्ये त्यांनी सत्याग्रह घडवून आणला. त्यात पोलिसांनी त्यांना पकडले. 51 रुपये दंड ठोठावला, पण दंड भरायला त्यांच्याकडे पैसे नव्हते म्हणून त्यांच्या वस्तूंचा लिलाव करून पोलिसांनी दंडाची रक्कम वसूल केली.

गांधीजींना विचारून आपल्या कर्मभूमीत अप्पांनी काम करायचे ठरवले. म्हणून रत्नागिरीच्या टिळक विद्यालयात ते अध्यापन करू लागले. शाळेतील मुलांना त्यांनी शेतीकाम, स्वावलंबन शिकवले. त्यावेळी सावरकर रत्नागिरीत स्थानबद्ध होते. तेथे ते अस्पृश्‍योद्धाराचे काम करू लागले. ते दलित वस्तीत जाऊन भजन करू लागले. त्यांच्या घरांत जाऊन पोथीवाचन करू लागले. सहभोजने घडवून आणू लागले. त्यांच्याबरोबर चरखा संघाचे काम, गांधी सेवा संघाचे काम करू लागले. खादीच्या कपड्यांचे प्रदर्शन भरवू लागले. 1927 साली महात्मा गांधी कोकणच्या दौऱ्यावर आले होते. पाच दिवसांच्या या दौऱ्यात खादीचा प्रचार व निधी संकलन हा उद्देश होता. अप्पांनी गांधींच्या दौऱ्याचे आयोजन करून त्यांना 8,500 रुपयांचा निधी मिळवून दिला. वालावली गावच्या रामनवमीच्या उत्सवात त्यांनी भाग घेतला. मात्र, तेथील अस्वच्छता पाहून त्यांनी साफसफाईचे काम हाती घेतले. या सफाई कामातूनच त्यांना सफाई कर्मचारी मुक्तीची कल्पना सूचली. पुढे अप्पांनी संशोधन करून निरनिराळ्या शौचालयांची निर्मिती केली. त्यातूनच “गोपुरी’, “सोपा’ व “गॅस प्लॅन्ट’ या शौचालयांची निर्मिती झाली. स्वातंत्र्यापूर्वी 26 जानेवारी हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून पाळण्यात येई. त्या दिवशी मालवण शहरात सफाईकाम करून त्यांनी स्वातंत्र्यदिन साजरा केला. आंबेरी गावच्या दलितांनी तेथील परिषदेत मृत जनावरे फाडण्याचे जाहीरपणे नाकारले. तर अप्पांनी तेथेच शपथ घेऊन एक वर्षाच्या आत “गुरू’ फाडण्याचे जाहीर केले आणि प्रत्यक्ष तसे करून दाखवले.

त्या काळी काही न्हावी हरिजनांचे केस कापण्यास नकार देत. अप्पा अशा न्हाव्ह्यांकडून स्वतःचे केस कापण्यास नकार देत. उलट काही हरिजनांनी सलूनची दुकाने थाटली तर अप्पांनी त्यांना आर्थिक सहाय्य केले. अप्पांनी स्वतःचे 731 पानी आत्मचरित्र लिहिले आहे. त्याचे नाव आहे “माझी जीवन-यात्रा’. तसेच अप्पांनी महात्मा गांधीजींच्या चरित्राचा “माझे सत्याचे प्रयोग’ या शीर्षकाने मराठी अनुवाद केला आहे. अप्पांनी कणकवलीजवळच्या गड नदीकाठी गोपुरी नावाचा आश्रम स्थापन केला. तेथे त्यांनी शेतीचे व सफाईचे अनेक प्रयोग केले. अप्पांनी 1930 च्या मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतलाच, पण 1942 च्या आंदोलनातही भाग घेतला. 1942 साली गांधीजींचे सेक्रेटरी महादेवभाई यांचे पुण्यात निधन झाले. त्यावेळी अप्पांना गांधीजींचे सेक्रेटरी होण्याची संधी होती, पण त्यांनी नम्रपणे नकार दिला आणि आपल्या कर्मभूमीतच काम करण्याचे ठरविले. अप्पा खादीचा पंचा वापरत. अंगावर खादीचेच उत्तरीय असे. काया कृश होती. डोळ्यांना चष्मा होता. डोक्‍यावरचे केस व दाढी ऋषीसारखी वाढलेली असे. 1971 साली अप्पा आजारी पडले. त्यांना पुण्याच्या दवाखान्यात ठेवले; परंतु 10 मार्च 1971 रोजी त्यांचे पुण्यात निधन झाले.

डॉ. दिलीप गरूड

Leave A Reply

Your email address will not be published.