पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे बंद असल्याने, भाविकांना दर्शन घेता येत नाही. या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने थेट बाप्पांच्या गाभाऱ्यातून दर्शन घेण्याची व्यवस्था श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात करण्यात आली आहे. त्यामुळे जगभरातील भाविकांची सोय होणार आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर मागील काही महिन्यांपासून मंदिरे बंद आहे. त्यामुळे अनेकांना दर्शन घेता येत नाही. तर अनेक भाविक दर्शनासाठी मंदिराबाहेर गर्दी करत आहेत. या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने तंत्रज्ञानाच्या मदतीने दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
“मॅटरपोर्ट’ या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आता थेट गाभाऱ्यातील दर्शन भाविकांना घेता येणार असून, यामुळे “थ्रीडी’ प्रकारात मंदिरातील आरास देखील पाहता येणार आहे, असे ट्रस्टचे महेश सूर्यवंशी यांनी सांगितले.