गेमिंगचे व्यसन ही एक मानसिक समस्या असेल, असा आपण कधी विचार तरी केला होता का.. कदाचित नाहीच. कारण, ही वेळही निघून जाईल, असे स्वत:चे समाधान करून घेत आपण या गोष्टीकडे कायम दुर्लक्षच करतो. गेमिंगच्या अति आहारी गेल्यामुळे अन्य व्यसनांप्रमाणेच याचेही दुष्परिणाम होतातच. जम्मू येथील एक फिटनेस ट्रेनर पबजी हा ऑनलाईन युद्धाचा खेळ अति प्रमाणात खेळल्यामुळे मानसिक संतुलन हरवून बसला आणि त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले, असा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला. गेमिंगचे व्यसन न लावून घेता, आपले मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य जपणे फारच महत्त्वाचे आहे.
गेमिंग व्यसनाचे सकारात्मक परिणाम
1. बौद्धिक क्षमतांमध्ये वाढ
2. हात व डोळ्यांच्या समन्वयात सुधारणा
3. त्वरित विचार करण्याची क्षमता आणि अचूकता यात सुधारणा
4. समस्या निवारण क्षमतेत वाढ
नैराश्याचे झटके कमी होण्याच्या शक्यता आपण कोणते खेळ खेळतो, त्यावर गेमिंगचे सकारात्मक परिणाम अवलंबून असतात. लैंगिकतेकडे झुकणारे किंवा आक्रमक संहिता असलेले खेळ आपल्यावर सकारात्मकतेऐवजी नकारात्मक परिणाम करतात.
गेमिंग व्यसनाचे नकारात्मक परिणाम
1. आरोग्यावर विपरित परिणाम – प्रौढ व्यक्तींमध्ये याचा विपरीत परिणाम होत असून आभासी खेळ खेळल्याने शारीरिक व्यायामापेक्षा या गेमिंगलाच प्राधान्य दिले जाते.
2. गेमिंगचे व्यसन – पॅथॉलॉजिकल गेमर्स किंवा अॅडिक्टेड गेमर्सना नैराश्य, निद्रानाश, सामाजिक एकलकोंडेपणा किंवा डिप्रेशनसारखे आजार होऊ शकतात. या घटकांचा एकमेकांवर परिणाम होतो. पॅथॉलॉजिकल गेमिंगमुळे समाजाची भीती मनात निर्माण होऊ शकते. यामुळे मुले गेमिंगकडे अधिकच ओढली जातात.
3. पौगंडावस्थेतील मुलांमधील आक्रमकता – अतिआक्रमक व्हीडिओ गेम्स खेळल्याने नकारात्मक परिणाम भोगावे लागतात. यामुळे आपल्या वागणुकीत, दृष्टिकोनात फरक पडत असून व्यसनाधीन व्यक्ती अधिकच एकलकोंडी व आक्रमक बनते.
व्यसनाची लक्षणे –
1. इतर कामे करतानाही गेम खेळण्याच्या विचाराने रोमांचित होणे
2. गेमिंगवर घालवलेल्या वेळाबद्दल गांभीर्य नसणे
3. गेमिंगमधून आनंदाची ठरावीक पातळी गाठण्यासाठी अधिकाधिक वेळ काढणे
4. काम, कुटुंब, आरोग्य आणि आर्थिक जबाबदा-यांकडे गेमिंगमुळे दुर्लक्ष करणे
5. गेमिंगबद्दल व्यसनाधीन व्यक्तीला इतरांनी हिणवल्यास, त्यासाठी चोरून वेळ काढणे किंवा इतरांच्या अपरोक्ष या कृत्यासाठी वेळ देणे
6. कॉम्प्युटर अपग्रेड्स आणि गेमिंगवर खूप पैसा खर्च करणे
समस्या निवारण करताना – इतर कोणत्याही व्यसनाप्रमाणेच या व्यसनापासून पूर्णपणे काही काळ लांब राहणे हा सर्वोत्कृष्ट उपाय असू शकतो. फोन किंवा कॉम्प्युटरमधील गेमिंग अॅप्स काढून टाका. व्यायामशाळेसारख्या ठिकाणी आपण स्वत:चे मन विचलित करू शकतो. चालायला जाणे, वाचन, एखादा छंद जोपासणे यासाठी वेळ काढू शकतो.