एचबीओवरची तुफान लोकप्रिय ठरलेल्या “गेम ऑफ थ्रोन्स’ मालिकेचा अखेरचा सिझन मे महिन्यात आला आणि त्याच्या चाहत्यांना ही मालिका संपल्याचे दुखः देऊन गेला. या मालिकेचे एकूण 8 सीझन प्रदर्शित झाले. 2011 मध्ये सुरू झालेल्या मालिकेने मे 2019 मध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता या मालिकेचा प्रीक्वल काढण्याचा विचार याचे निर्माते करत असून लवकरच त्याचे कथा लेखनाला सुरूवात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या मालिकेचा प्रीक्वल जॉर्ज आर. आर. मार्टिन यांच्या “फायर अँड ब्लड’ या कांदबरीवर आधारित असेन. प्रीक्वलची कथा ही साधरण टायगेरियन घराण्यास केंद्रस्थानी ठेवून लिहिली जाईन. “गेम ऑफ थ्रोन्स’ च्या ताकदवान आणि लढवय्या घराण्यांपैकी टायगेरियन घराण एक आहे. आग ओकणारे ड्रॅगन्स या कुटुंबाकडे असतात. “गेम ऑफ थ्रोन्स’ या लोकप्रिय काल्पनिक मालिकेतील या कुटुंबाचा उदय आणि अस्त प्रीक्वलमध्ये दाखवण्यात येईल अशी चर्चा आहे.
त्याप्रमाणे वेस्टेरॉसच्या इतिहासातील भयानक गुपिते, व्हाइट वॉकर्सचा उदय, पूर्वेला असलेल्या स्टार्क घराण्याचा इतिहास असे आधीच्या सिझनमध्ये न उलगडलेले असंख्य पैलू या प्रीक्वलमध्ये पाहायला मिळतील. सध्यातरी एचबीओने याची औपचारिक घोषणा केलेली नाही. मात्र लवकरच प्रीक्वलसाठी कथा लिहिण्याच्या कामास सुरूवात होईल अशी चर्चा आहे.