गेमचेंजर खेळी ? (अग्रलेख)

लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम आगामी दीड महिन्यांनंतर जाहीर होणार असला तरी या निवडणुकांसाठीची रणधुमाळी एव्हाना सुरू झाली आहे. त्याअनुषंगाने राजकीय पक्षांमध्ये संक्रमणाचा काळही सुरू झाला आहे. गेल्या काही दिवसांतील घटना पाहिल्यास येणाऱ्या काळात राजकीय वातावरण कोणत्या दिशेला जाईल याचा नेमका अंदाज बांधणे कठीण ठरत आहे. मोदी विरुद्ध सर्व असा या वातावरणाचा मसावि आहे हे एव्हाना स्पष्ट झाले आहे; पण उर्वरितांमधील एकोपा शेवटपर्यंत राहणार का, याबाबत प्रश्‍नचिन्ह कायम आहे.

सपा-बसपाच्या युतीमुळे हे प्रश्‍नचिन्ह गडद झाले आहे. लोकसभेच्या 80 जागा असणारा उत्तर प्रदेश हा दिल्लीच्या खुर्चीपर्यंत जाण्याचा महामार्ग आहे. त्यामुळे प्रमुख पक्षांचे लक्ष या राज्याकडे आहे. अखिलेश-मायावती यांनी भाजपा हाच आमचा प्रमुख विरोधक असेल असे सांगितले असले तरी या युतीमुळे होणाऱ्या मतविभागणीचा फायदा भाजपालाच होईल असाही तर्क लढवला जात आहे. त्यामुळेच कॉंग्रेसनेही उत्तर प्रदेशावर लक्ष केंद्रित केले आहे. उत्तर प्रदेशात कॉंग्रेसची ताकद पूर्वीसारखी राहिलेली नाही.

2009 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात कॉंग्रेसचे 21 खासदार निवडून आले होते. 2014 च्या मोदी लाटेत ही संख्या अवघ्या 2 वर आली. गेल्या चार वर्षांत राहुल गांधी यांचा करिष्मा देशभरात वाढत गेला असला तरी उत्तर प्रदेशातील कॉंग्रेसमध्ये फारसे चैतन्य निर्माण झाले आहे किंवा तिथली कॉंग्रेस विस्तारत आहे असे चित्र दिसलेले नाही. त्यामुळेच आता कॉंग्रेसने या महत्त्वपूर्ण राज्यासाठी प्रियांका गांधी हा आपला हुकमी एक्‍का काढला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वस्तुतः, सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियंका गांधी-वढेरा ह्या राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या गेल्या पाच-सहा वर्षांत अधूनमधून प्रसारित होत होत्या; पण आता त्यांच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशावर शिक्‍कामोर्तब झाले आहे. प्रियांका यांची महासचिवपदी करण्यात आलेली निवड अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण आहे. आजवर प्रियांका सक्रिय राजकरणात नसल्या तरी, आपली आई आणि भावाच्या निवडणूक प्रचारात त्या नेहमीच सहभागी होत होत्या. अमेठी आणि रायबरेली या लोकसभेच्या दोन्ही मतदारसंघात प्रियांका जोमाने प्रचार करत होत्या. त्यामुळे त्या राजकारणाला नवख्या नाहीत.

“”अमेठी का डंका, बेटी प्रियांका” अशा घोषणा कॉंग्रेसच्या उत्तर प्रदेशामधील कार्यकर्त्यांकडून नेहमीच दिल्या गेलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. प्रियांकाने मात्र आपण राजकारणात कदापी प्रवेश करणार नाही असे आजवर म्हटले होते. पण तरीही उत्तर प्रदेशातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडून त्यांच्या नेतृत्वाची मागणी सातत्याने होताना दिसली. प्रियांकांचे वागणे, बोलणे पाहिल्यावर त्यांची आजी इंदिरा गांधी यांचा भास होतो. प्रियांकांनी मनात आणले असते तर त्या राजकारणात केव्हाच आल्या असत्या; मात्र राहुल यांनी राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा दाखवल्यावर प्रियांकांनी आपल्या भावाला सहाय्य करण्याची भूमिका आजवर वठवली आहे.

स्तुतीपाठकांच्या प्रशंसेला भुलून त्यांनी कदापी राजकारणात प्रवेश करण्याचा विचारही मनात आणलेला नाही. त्यांची वागण्या- बोलण्याची शैली इंदिरा गांधी यांच्या शैलीशी साधर्म्य दाखवणारी असली तरी आजीसारखे उपजत नेतृत्व गुण त्यांच्यात आजघडीला तरी दिसत नाहीत. इंदिरा गांधी यांना देशाच्या राजकारणाची जबरदस्त आकलनक्षमता होती. आणीबाणीचा निर्णय सोडला तर त्यांचे राजकारणातील सगळे आडाखे, डावपेच यशस्वी ठरले होते. पंडित नेहरूंच्या निधनानंतर कॉंग्रेसमधील कामराज, निजलिंगप्पा, अतुल्य घोष, स. का.पाटील व मोरारजी देसाई अशा ज्येष्ठ मंडळींनी इंदिरा गांधींना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. ही तरुण मुलगी आपल्या पुढे काय टिकणार, असा समज या जाणत्या मंडळींनी करून घेतला होता.

“”गुंगी गुडीया” अशी हेटाळणी झालेल्या इंदिरा गांधींनी न बोलता अशा काही खेळ्या केल्या की, ही बुजुर्ग मंडळी राजकारणाच्या चौकटी बाहेर फेकली गेली. असले राजकारण खेळण्याची क्षमता प्रियांका गांधींकडे असल्याचे आजवर तरी दिसून आलेले नाही. त्यामुळे ऐन 2019 च्या लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला असला तरी सध्याच्या पातळीहीन राजकारणाच्या रणांगणात त्यांना अत्यंत कसोशीने लढावे लागणार आहे.

इंदिरा गांधी यांच्या काळातील मतदार, राजकारण, राजकीय वातावरण आणि आजच्या काळातील मतदार यात जमीन-अस्मानाचा फरक पडला आहे. इंदिरा गांधी यांना खुषमस्कऱ्यांची मनापासून आवड होती. राहुल गांधींना अशा राजकारणाची मनापासून तिडीक आहे. आपले नेतृत्व अबाधित राहावे म्हणून इंदिरा गांधी राज्या-राज्यातील सुभेदारांना कधीच स्थिरावू देत नसत. त्यामुळेच इंदिरा गांधींच्या काळात कॉंग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री वारंवार बदलले जात होते. सोनिया व राहुल गांधी यांना राजकारणातले असले डावपेच खेळावेसे वाटत नाहीत. प्रियांका या आपल्या आई आणि भावाप्रमाणेच आहेत असे त्यांचे आजवरचे वर्तन पाहिल्यावर वाटते.

प्रियांकांकडे पूर्वांचलची जबाबदारी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी मतदारसंघ याच क्षेत्रात आहे. याखेरीज उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ यांचा गोरखपूर मतदारसंघही याच भागात आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी भाजपानेही नरेंद्र मोदी यांना वाराणसी मतदारसंघातून उतरवून मोठी खेळी खेळली होती आणि ती यशस्वीही झाली. पूर्वांचलमध्ये मोदी लाटेमुळे सर्वच पक्षांचा सुपडासाफ झाला होता. केवळ आझमगडची जागा सपाने जिंकली होती. 2017 च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन दिवस पूर्वांचलमध्ये तळ ठोकला होता आणि त्या निवडणुकीत कॉंग्रेस-सपाच्या आघाडीचा धुव्वा उडाला होता. यावरून प्रियांकांकडे जबाबदारी सोपवण्यात आलेल्या प्रदेशाचे महत्त्व लक्षात येते.

प्रियांकांना मानणारा तसेच त्यांच्याकडे आकर्षित होणारा एक मोठा मतदारवर्ग आहे. त्यामुळेच आजवर त्या निवडणुकांच्या काळात कॉंग्रेसच्या प्रचारासाठी उतरत राहिल्या. त्यांच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरणे स्वाभाविक आहे. अर्थात, ही एंट्री गेमचेंजर ठरते का हे येणारा काळच ठरवेल. कारण त्यांच्यापुढे आव्हानही तितकेच मोठे आहे.

भाजपाकडून घराणेशाहीची टीका तर लागलीच झाली आहे; पण येणाऱ्या काळात रॉबर्ट वढेरांचा संदर्भ देऊनही प्रियांकांना लक्ष्य केले जाईल. या टीकांना प्रियांका कशा प्रकारे उत्तर-प्रत्युत्तर देतात यावर त्यांचा करिष्मा अवलंबून असणार आहे. मात्र, आक्रमक झालेले राहुल गांधी आणि आता प्रियांकांचा प्रवेश यामुळे येणाऱ्या काळात देशाच्या राजकारणातील घुसळण अधिक गतिमान होणार आहे यात शंका नाही.

1 COMMENT

  1. वरील अग्रलेख वाचला पित्याच्या खेळात हुकमाची दुर्री सुद्धा राजावर मात करते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)