शिक्रापूर पोलीस निरीक्षकांनी तक्रारदारासच झापले

सणसवाडीत मटका व जुगार तेजीत : दाद कोणाकडे मागायची

शिक्रापूर – शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पोलीस स्टेशन हद्दीतील सणसवाडी येथे बेकायदेशीर मटका व जुगार अड्डा जोरात सुरू आहे. याबाबत तक्रार करणाऱ्या तक्रारदारास शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांकडून खडेबोल सुनावले गेले आहेत. या अवैध व्यवसायांना पोलीस पाठीशी घालत असल्याचे दिसून येत आहे.

सणसवाडी येथील पुणे- नगर महामार्गालगतच एका मोठ्या पत्राशेडमध्ये मटका, जुगार खेळवित नागरिकांची लूट केली जात आहे. याबाबत सणसवाडी येथील सागर दरेकर या माहिती अधिकार कार्यकर्त्याने या प्रकारांचे चित्रीकरण करून शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांना माहिती दिली. त्यानंतर लगेचच काही वेळात हा व्यावसायिक सर्व साहित्य घेऊन निघून गेला. काही वेळात पोलीस आले.

पोलिसांना काहीही आढळले नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी दरेकर यांनी पुन्हा पाहणी केली असताना तेथे जुगार व मटका सुरू असल्याचे सदाशिव शेलार यांना माहिती देण्यासाठी फोन केला. त्यावेळी शेलार यांनी त्याला सारखा फोन करतो, खोटे बोलतोस, पोलिसांना काय तेवढेच काम आहे का, असे खडेबोल सुनावले. काही वेळ तो कार्यकर्ता मुद्दाम तेथे थांबलेला असताना हा व्यावसायिक त्यांच्या साहित्यांची आवराआवर करून घाईघाईने निघून गेला. त्यामुळे व्यावसायिकांना पोलिसांचेच अभय मिळत आहे. कारवाईसाठी येत असल्याची माहिती दिली जात असल्याची चर्चा रंगली आहे.

शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीसह कोठेही कोणत्याही अवैध व्यावसायिकांना पाठीशी घातले जाणार नाही. या व्यवसायांची माहिती मिळाल्यास कारवाई करून त्या भागातील माहिती वरिष्ठांना सादर करणार आहे.
-डॉ. सचिन बारी, उपविभागीय पोलीस अधिकारी.

Leave A Reply

Your email address will not be published.