शोधबोध: गॅलिलिओ गॅलिली

दीपा देशमुख

16 व्या शतकापर्यंत जवळ जवळ फारसे मोठे वैज्ञानिकही नव्हते. सूर्य पृथ्वीभोवती फिरतो किंवा दोन वस्तू खाली सोडल्या तर त्यातली जड वस्तू हलक्‍या वस्तूपेक्षा आधी जमिनीवर पडते, असं ऍरिस्टॉटल म्हणायचा. टॉलेमीनं देखील अनेक गोष्टीत ऍरिस्टॉटलचीच री ओढली होती. गंमत म्हणजे या दोघांना विरोध करण्याची त्या काळी कोणामध्येच हिंमत नव्हती. ती हिंमत पहिल्यांदा वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी गॅलिलिओनं दाखवली.

गॅलिलिओचा जन्म इटलीमधल्या टस्कनी प्रांतातल्या पिसा इथे विन्चॅन्सो गॅलिली आणि ज्यूलिया अमान्नाती या जोडप्याच्या पोटी झाला. गॅलिलिओ ज्या घरात राहत असे तिथेच त्याच्या आठवणीदाखल एक शिलालेख कोरला असून त्यावर मायकेल अँजेलो या जगप्रसिद्ध चित्रकाराच्या मृत्यूच्या आधी 2 तास गॅलिलिओचा जन्म झाला असल्याचा उल्लेख आहे. गॅलिलिओला विन्चॅन्सोनं ग्रीक आणि लॅटिन संगीत शिकवलं. होमर, दान्ते आणि व्हर्जिल यांची काव्यं गॅलिलिओला तोंडपाठ होती. विन्चॅन्सोचं कलासक्त मन, झपाटलेपण, बंडखोरवृत्ती, पुरोगामी विचारांची कास, प्रयोगशीलता आणि सर्जनशीलता या गोष्टींचा प्रचंड मोठा प्रभाव गॅलिलिओवर पडला. विन्चॅन्सोला आपल्या मुलानं डॉक्‍टर व्हावं असं वाटत होतं. कारण त्या काळी इटालियन समाजात डॉक्‍टर होणं खूप प्रतिष्ठेचं समजलं जात असे. शिवाय डॉक्‍टरी पेशात पैसाही भरपूर मिळत असे. पण गॅलिलिओला मुळीच डॉक्‍टर व्हायचं नव्हतं. पण त्याला वडिलांसमोर मान तुकवावी लागली आणि त्यानं वैद्यकीय शिक्षण घेणं सुरू केलं.

वैद्यकीय अभ्यासक्रम शिकत असताना गॅलिलिओला ऍरिस्टॉटलबद्दल आणि त्यानं केलेल्या कामाबद्दलची माहिती मिळत गेली. त्याला ग्रीक तत्त्वज्ञानातल्या अनेक गोष्टी खटकायला लागल्या. पूर्वीचं सगळं तत्त्वज्ञान प्रयोग आणि निरीक्षण यांच्याऐवजी फक्त तर्कावरच आधारलेलं होतं आणि गॅलिलिओला हे मुळीच मान्य नव्हतं. विज्ञान हे प्रयोगाच्या आणि निरीक्षणांच्या आधारावर उभं असलं पाहिजे असं त्याला वाटे. याच वेळी गॅलिलिओला आपला खरा ओढा गणिताकडे असल्याचं लक्षात यायला लागलं. त्यामुळे त्याच्या वैद्यकीय अभ्यासाच्या वर्गाला दांड्या पडायला लागल्या. साहजिकच त्याचे प्राध्यापक त्याची कानउघाडणी करायला लागले.

त्या काळात पिसाच्या दरबारात गणिती असणारा ऑस्टिलिओ रिची हा गॅलिलिओच्या कुटुंबाचा खास जुना मित्र होता. पिसामधल्या चर्चमध्ये जायला गॅलिलिओला खूप आवडायचं. एका (दंत) कथेप्रमाणे 1583 साली गॅलिलिओ फक्‍त 17 वर्षांचा असताना एका रविवारी धर्मगुरूंचं पिसामधल्या कॅथिड्रलमध्ये कंटाळवाणं प्रवचन सुरू असताना त्यानं छतावर लटकणारा नक्षीदार दिवा बघितला. वाऱ्याच्या झोताबरोबर तो दिवाही झोके घेत होता. त्या झोक्‍याचं लयबद्ध मागेपुढे होणं गॅलिलिओला अचंबित करून गेलं आणि त्यानं लगेचच प्रयोगाला सुरुवात केली. त्यानं दोन वेगवेगळ्या वजनाच्या वस्तू घेतल्या. झोका लहान असो वा मोठा किंवा लंबकाचं (पेंड्युलमचं) वजन कमी असो वा जास्त, जोपर्यंत लंबकाच्या दोरीची लांबी तेवढीच राहते, तोपर्यंत त्याच्या आंदोलनाला तेवढाच वेळ लागतो, असा निष्कर्ष गॅलिलिओनं प्रयोगांनंतर निरीक्षणं करून काढला.

दोरीची लांबी बदलली तर मात्र हा आंदोलनासाठी लागणारा वेळ बदलतो हेही त्याला समजलं. या सगळ्या प्रयोगांसाठी त्याकाळी घड्याळ नसल्यानं वेळ मोजण्यासाठी त्यानं हाताची नाडी वापरली. याच पेंड्युलमचा वापर नंतर गॅलिलिओनं त्याचे “गतीचे नियम’ मांडण्यासाठी केला आणि याच पेंड्युलमचा वापर करून ह्यूजेन्सनं पहिलं घड्याळ बनवलं. त्या कॅथिड्रलमध्ये जो दिवा आहे, तो “गॅलिलिओचा दिवा’ म्हणून आजही ओळखला जातो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.