न्यूयॉर्क : जगात असे अनेक प्राणी आहेत, ज्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. कासव हा त्यापैकीच एक प्राणी आहे. कासवांच्याही अनेक प्रजाती आहेत, परंतु आज आपण ज्या कासवाबद्दल बोलत आहोत तो एक अत्यंत दुर्मिळ कासव आहे. या प्रजातीचे नाव गॅलापागोस प्रजाती आहे, जी खूप विशालकाय आहे. परंतु ती नामशेष होत आहे. या पार्श्वभूमीवर याच प्रजातीचा 70 वर्षांचा कासव पहिल्यांदाच बाप बनल्यामुळे चर्चेत आहे.
हा वयोवृद्ध गॅलापागोस कासव वयाच्या 70 व्या वर्षी त्याच्या आयुष्यात दोन कासवांचा बाप बनला आहे. त्याच्या प्रजननक्षमतेमुळे, त्याची जगभरात सर्वत्र चर्चा आहे. ब्रिटनमध्ये प्रथमच या प्रजातीच्या कासवाने मुलांना जन्म दिला आहे.
* त्याच्याहून 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या कासविणीला झाली पिल्ले
ऑक्सफर्डशायरच्या जागतिक प्राणीसंग्रहालयात राहणाऱ्या या महाकाय कासवाचे नाव डर्क आहे. 21 वर्षांच्या मादी कासविण चार्लीला 70 वर्षीय डर्कपासून 2 पिल्ले झाली आहेत. दोन्ही पिल्लं किवीएवढी मोठी आहेत. त्यांचे वजन 67 आणि 69 ग्रॅम आहे, असे वृत्त डेली मेलने दिले आहे. ही दोन्ही पिल्ले मादी कासव आहेत. या पिल्लांची विशेष काळजी घेतली जात आहे. गेली 3 वर्षे प्रयत्न केल्यानंतर डर्क आता बाबा झाला आहे.
* या कासवांची लांबी 6 फुटांपर्यंत वाढते
या विशेष प्रजातीच्या कासवांबद्दल असे म्हटले जाते की त्यांची लांबी 6 फुटांपर्यंत असते. ते खूप मोठा आवाज करतात. 19 व्या शतकात या कासवांची संख्या लक्षणीय होती असे म्हटले जाते. मात्र, आता केवळ 15 हजार कासवे उरली आहेत. L मोठा आकार, वजन आणि लांब मान यासाठी हे कासव ओळखले जातात. त्यांची घटती प्रजनन क्षमता आणि लोकसंख्या आता जीवशास्त्रज्ञांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. अशा परिस्थितीत या दोन कासव पिल्लांचा जन्म हा या दिशेने काही सकारात्मक परिणाम मानला जात आहे.