विविधा: गजानन वाटवे

माधव विद्वांस

आपल्या अवीट गोडीच्या भावगीतांनी आणि संगीताने 60 वर्षांहून अधिक काळ श्रोत्यांना मोहून टाकणारे गायक व संगीतकार गजानन वाटवे यांचे आज पुण्यस्मरण. (निधन- 2 एप्रिल 2009) त्यांचा जन्म 8 जून 1916 रोजी झाला. गाण्याच्या ओढीने बेळगावहून घर सोडून साधारण वयाच्या 13 व्या वर्षी ते पुणे येथे आले. पुणे येथे आल्यावर त्यांनी मिळेल ते काम करीत कष्ट करून आपल्या संगीतसाधनेस सुरुवात केली. त्यांनी गोविंदराव देसाई यांच्या “गोपाल गायन’ समाजामध्ये गायनाचे धडे घेतले. त्यावेळी त्यांची तब्येतही बिघडली; पण त्यावर मात करून शिक्षण सुरूच ठेवले. त्यांच्या गायनाने आणि संगीताने भावगीत हा प्रकार श्रोत्यांच्या पसंतीस उतरला. नारायण सोहोनी आणि दसनूरकर हे त्यांचे मित्र गोपाल गायन समाजात त्यांच्याबरोबर शिक्षण घेत होते.

माधव ज्युलियन यांची “चल उडुनी जा पाखरा, पाहा किती रम्य पसरली वसुंधरा’ ही कविता एका मासिकात छापून आली होती, ती दसनूरकरांनी त्यांना दाखवली. कविता वाचल्यावर ती त्यांनी एका वहीत लगेचच उतरून काढली व त्या कवितेला चाल लावण्याचा प्रयत्न केला. पेटीचे सुरांच्या बटनावर हात फिरत असताना गळ्यातून स्वरही उमटले व त्यांनी स्वरबद्ध केलेली व गायलेली पहिली कविता त्यांच्या मित्राला ऐकविली. अशा तऱ्हेने त्यांच्या
स्वतःचे स्वरातील पहिले व स्वतः संगीतबद्ध केलेले ते पहिले गाणे ठरले. त्यांच्या त्या वहीत हळूहळू भर पडत गेली. कवी अनिल, माधवराव पटवर्धन, गिरीश, मायदेव, तांबे, सानेगुरुजी अशा कवींच्या अर्थपूर्ण कविता वहीत उतरविला गेल्या.

त्यांनी मित्रांच्या साहाय्याने एक खोली भाड्याने मिळविली तसेच लिमये बंधूंच्या मदतीने अर्थार्जनासाठी एकेरी सुरांची एक पेटी, एक तबला आणि डग्गा घेऊन गाणे शिकवण्याचे वर्ग सुरू केले. गायन शिक्षक म्हणून ते लवकरच पुण्यात प्रसिद्धीस आले. महर्षी कर्वे यांच्या मुलींच्या शाळेत ते शिकविण्यासही जाऊ लागले. वर्ष 1938 उजाडले ते 22 वर्षांचे होते, त्यांच्या मित्राने त्यांना न विचारता फर्गसन महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात त्यांचा गाण्याचा कर्यक्रम ठेवला, नाव पुकारले गेले आणि त्यांच्या मित्राने त्यांना मंचावर आणले व हातात पेटी दिली अचानक आलेल्या प्रसंगाने ते थोडे गडबडले; पण त्यांच्यातला गायक जागा झाला आणि त्यांनी पहिला कार्यक्रम यशस्वी केला. त्यावेळी त्यांना मानधन म्हणून 15 रुपये मिळाले. ते स्वतःला ‘काव्यगायक’ म्हणवून घेत असत.

इंग्रज सरकारने 3 सप्टेंबर 1939 रोजी दुसऱ्या महायुद्धाची घोषणा केली त्याच दिवशी आकाशवाणीवर त्यांचा पहिला कार्यक्रम झाला आणि त्याच दिवशी एच.एम.व्ही. बरोबर त्यांच्याशी गाण्याचे ध्वनिमुद्रणाचा करार झाला. गजानन वाटवेंनी संगीतबद्ध केलेली फांद्यावरी बांधिले गं, मैत्रिणींनो सांगू नका नाव घ्यायला, यमुनाकाठी ताजमहाल, मी निरंजनातील वात, रानात सांग कानात आपुले नाते ही भावपूर्ण गीते आजही गुणगुणली जातात. दोन ध्रुवांवर दोघे आपण, राधे तुझा सैल अंबाडा ही त्यांची गीते आजही लोकप्रिय आहेत. बघता बघता त्यांची गानसंपदा शंभरी पार करून गेली. लता मंगेशकर पुरस्कार, गदिमा प्रतिष्ठानचा पुरस्कार, युगप्रवर्तक पुरस्कार, सुशीलस्नेह पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले. त्यांची मुलगी मंजिरी चुणेकर यांनी त्यांच्यावर गगनी उगवला सायंतारा हे चरित्र लिहिले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.