गजानन मारणे रॅली प्रकरण : माजी खासदार संजय काकडे यांना अटक

पुणे – माजी खासदार संजय काकडे यांना पुणे पोलिसांनी गजानन मारणे रॅली प्रकरणात दाखल असलेल्या गुन्ह्याशी संबंधात अटक केली आहे. कुख्यात गुन्हेगार गजानन मारणे याने तळोजा तुरुंगातून सुटल्यानंतर मुंबई-पुणे एक्‍स्प्रेसवे वर शेकडो कारचा सहभाग असलेली रॅली काढली होती. या प्रकरणात दाखल गुन्ह्यात ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.

मारणे याने तळोजा तुरुंगातून सुटल्यावर जंगी मिरवणूक काढली होती. मुंबई-पुणे एक्‍स्प्रेसवर काढलेल्या या मिरवणुकीत शेकडो कार होत्या. त्यानंतर सोशल मीडियावरून त्याचे फोटो व व्हिडिओ व्हायरल केले होते. या प्रकरणी गुन्हे शाखेकडून तपास करून बंडगार्डन पोलिस ठाण्यात गजानन मारणेसह इतरांवर गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात काकडे यांना चौकशीसाठी बोलावले होते. बुधवारी सकाळी बंडगार्डन पोलिसांनी काकडे यांना अटक केली. यापूर्वीही काकडे यांना गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. दरम्यान रॅली प्रकरणी मारणे विरोधात शहरातील विविध पोलिस ठाण्यात देखील गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल डफळ यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांच्या चौकशीत त्याचे गजा मारणेशी संजय काकडे यांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबध असल्याचे उघड झाले. यानंतर त्यांना गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड आणी पथकाने काकडे यांना अटक करुन न्यायालयात हजर केले. मारणेवर दाखल असलेल्या गुन्हयात काकडे साक्षीदारांवर दबाव टाकणे, प्रलोभणे दाखवणे किंवा धमकी देण्याची शक्‍यता आहे. यामुळे त्यांना पाच दिवस पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी न्यायालयात केली. सदर रॅली काढून दहशत निर्माण करण्याचा कट कोणी रचला? कट रचण्यामागे आरोपीचा नक्की उद्देश कोणता होता ? त्याचे अन्य साथीदार कोण आहेत ? याचा तपास पोलीस करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.