पिंपरी- पिंपरी चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाचे माजी सदस्य आणि शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख गजानन पोपट चिंचवडे (वय – 52) यांचे आज सकाळी साडेअकराच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले. त्याच्या मागे पत्नी शिवसेना नगरसेविका अश्विनी चिंचवडे आणि दोन मुले असा परिवार आहे.
शनिवारी (दि. 5) सकाळी अंघोळीसाठी ते बाथरुमध्ये गेले असताना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गजानन चिंचवडे यांनी सुरूवातीला प्रा. रामकृष्ण मोरे यांच्यासोबत कॉंग्रेसमधून राजकीय जीवनाला सुरुवात केली. पीसीएमटी सदस्य, महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले. खासदार श्रीरंग बारणे यांचे अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. महापालिकेच्या नवीन प्रभाग रचनेत चिंचवडगाव येथून निवडणूक लढविण्यासाठी त्यांची तयारी सुरू होती. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने चिंचवड परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.